
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या किरू जलविद्युत प्रकल्पातील भ्रष्टाचार मी उघड केला होता. आता मला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला.
जम्मू-काश्मीरच्या किरू जलविद्युत प्रकल्पाच्या भ्रष्टाचारप्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर १५ दिवसांनंतर मलिक यांनी मौन सोडले. ‘एक्स’वरील पोस्टमध्ये ते म्हणाले की, मी एक महिन्यापासून रुग्णालयात आहे. मूत्रपिंडाच्या समस्येने मी ग्रस्त आहे. माझ्याकडे पैसा असता तर मी खासगी रुग्णालयात दाखल झालो असतो. ज्या प्रकरणात मला
अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ती निविदा मीच रद्दबातल केली होती. मी स्वत: पंतप्रधानांना याबाबत माहिती दिली होती. मी त्यांना सांगितल्यावर निविदा रद्द केली. माझ्या बदलीनंतर अन्य कोणाच्या स्वाक्षरीने ही निविदा मंजूर झाली.
सीबीआयने २२ मे रोजी सत्यपाल मलिक यांच्यासह ५ जणांविरुद्ध जम्मू-काश्मीरच्या किरू जलविद्युत भ्रष्टाचारप्रकरणी आरोपपत्र दाखल केले. या कंत्राटात २२०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. सीबीआयने २२ फेब्रुवारी २०२४ रोजी मलिक यांच्या घरी छापे मारले होते.