
काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाचे (आप) नेते व मंत्री सत्येंद्र जैन यांना तिहार कारागृहात मसाज केली जात असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर आप आणि विरोधकांमध्ये चांगलेच खटके उडाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मसाज देणारी व्यक्ती ही फिजिओथेरपिस्ट असल्याचा दावा आपकडून करण्यात आलेला. यावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी आरोप केला आहे की, ती मसाज करणारी व्यक्ती फिजिओथेरपिस्ट नसून बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आरोपी आहे. यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे.
भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी सांगितले की, "ज्या व्यक्तीने तुरुंगात सत्येंद्र जैन यांची मसाज केली, ज्याला अरविंद केजरीवाल फिजिओथेरपिस्ट म्हणत होते, तो फिजिओथेरपिस्ट नसून बलात्कारी आहे. मसाज करणारा हा तिहार तुरुंगात पोस्को कायदा आणि आयपीसीच्या कलम ३७६ अंतर्गत बलात्काराच्या खटल्यात आरोपी आहे. अरविंद केजरीवाल अशा व्यक्तीकडून मसाजला फिजिओथेरपी म्हणत आहेत."
पुढे त्यांनी म्हंटले की, "इंडियन फिजिओथेरपी असोसिएशनने आधीच स्पष्ट केले आहे की, ही फिजिओथेरपी नसून फक्त तेलाने केलेला मसाज आहे. यावरून हे स्पष्ट होते की, गेल्या ५ महिन्यांपासून तिहार तुरुंगाच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेला आणि जामीन अर्ज प्रत्येक वेळी फेटाळलेल्या सत्येंद्र जैन यांना तिहारमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते आहे. तुरुंगात सत्येंद्र तेल मसाजसह खंडणीचे कामही करत आहे. असे असतानाही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया त्यांचा बचाव करत आहेत. संपूर्ण प्रकरणाचे सत्य समोर आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री जनतेची माफी मागणार का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.