
जम्मू-कश्मीरसह पाच राज्यांमध्ये राज्यपालपद भूषवणारे ज्येष्ठ नेते सत्यपाल मलिक यांचे आज (दि.५) निधन झाले आहे. दिल्लीतील राममनोहर लोहिया रुग्णालयात त्यांच्यावर दीर्घकाळ उपचार सुरू होते. उपचारादरम्यान दुपारी १ वाजून १२ मिनिटांच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. ते ७९ वर्षांचे होते. विद्यार्थी राजकारणातून राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणारे सत्यपाल मलिक आपल्या शेवटच्या काही वर्षांत मोदी सरकारच्या विरोधात थेट भूमिका घेणाऱ्या नेत्यांपैकी एक ठरले.
एक्स हँडलवरून निधनाची माहिती
मलिक यांच्या अधिकृत एक्स (पूर्वीचा ट्विटर) अकाउंटवरून त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आली. याच खात्यावरून ९ जुलै रोजी त्यांच्या खासगी सहाय्यकाने त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे शेवटचे अपडेट दिले होते.
शेतकरी आंदोलनात ठाम पाठिंबा
शेतकरी आंदोलनाच्या वेळी सत्यपाल मलिक यांनी सरकारवर थेट टीका करत स्पष्ट भूमिका घेतली होती. त्यांनी अनेक राज्यांत दौरे करत तीन वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची मागणी सरकारकडे केली होती. या कारणामुळे ते मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले होते.
पाच वर्षांत पाच राज्यांचे राज्यपाल
मलिक यांनी २०१७ ते २०२२ या कालावधीत बिहार, ओडिशा, जम्मू-कश्मीर, गोवा, मेघालय या राज्यांमध्ये राज्यपालपदाची जबाबदारी पार पाडली. बागपतमधील हिसावडा गावातील रहिवासी सत्यपाल मलिक यांनी १९६५-६६ मध्ये विद्यार्थी नेते म्हणून सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि मेरठ कॉलेज विद्यार्थी संघटनेचे आणि मेरठ विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम केले, जे आता चौधरी चरण सिंग विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. मलिक स्वतःला दिवंगत पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचे शिष्य म्हणायचे.
कलम ३७० हटवले, लडाख वेगळे राज्य
जम्मू-कश्मीरच्या राज्यपालपदाच्या काळातच कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आणि राज्याच्या पुनर्रचनेनंतर लडाख हे केंद्रशासित प्रदेश म्हणून वेगळे करण्यात आले. या निर्णयामुळे मलिक यांचे नाव कायमच चर्चेत राहिले.
भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे वादात
सत्यपाल मलिक यांनी हायड्रोपॉवर प्रकल्पात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र याच प्रकरणात सीबीआयने त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. रुग्णालयातूनच त्यांनी यावर आक्षेप घेत असा सवाल उपस्थित केला होता की, “ज्याने भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड केले त्याच्यावरच कारवाई का?”
लोकसभा निवडणुकीत सरकारविरोधात प्रचार
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यानही सत्यपाल मलिक यांनी उघडपणे मोदी सरकारचा विरोध केला होता आणि विरोधकांच्या समर्थनार्थ मत देण्याचे आवाहन जनतेला केले होते. मलिक यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.