सौदी अरेबियातील अपघातात ४५ भारतीयांचा होरपळून मृत्यू

सौदी अरेबियात भारतीय प्रवाशांना घेऊन मक्काहून मदिनाला जाणारी एक बस आणि डिझेल टँकर यांची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये बसमधील ४५ भारतीय हज यात्रेकरूंचा होरपळून मृत्यू झाल्याची भीषण घटना घडली. अपघातग्रस्त बसमधील बहुतेक प्रवासी तेलंगणातील हैदराबादचे रहिवासी आहेत.
सौदी अरेबियातील अपघातात ४५ भारतीयांचा होरपळून मृत्यू
Published on

जेद्दाह/नवी दिल्ली : सौदी अरेबियात भारतीय प्रवाशांना घेऊन मक्काहून मदिनाला जाणारी एक बस आणि डिझेल टँकर यांची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये बसमधील ४५ भारतीय हज यात्रेकरूंचा होरपळून मृत्यू झाल्याची भीषण घटना घडली. अपघातग्रस्त बसमधील बहुतेक प्रवासी तेलंगणातील हैदराबादचे रहिवासी आहेत.

भारतीय वेळेनुसार रात्री १.३० वाजता मुफ्रीहाट स्थानकाजवळ हा अपघात झाला आहे. बस व डिझेल टँकरच्या धडकेमुळे टँकरमधील डिझेल पेटले आणि त्यातून झालेल्या स्फोटात बसमधील ४५ यात्रेकरूंचा होरपळून मृत्यू झाला आहे.

अपघाताच्या वेळी बसमधील प्रवासी झोपलेले होते. त्यामुळे धडकेनंतर बसला आग लागल्यावर त्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. मृतांमध्ये किमान ११ महिला आणि १० मुलांचा समावेश आहे. बसचा चालक या भीषण अपघातातून बचावला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. टँकरमध्ये डिझेल असल्यामुळे अपघातानंतर टँकर व बसने पेट घेतला. ज्यामध्ये अनेक प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला.

या अपघातात जखमी झालेल्या काही प्रवाशांवर जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी काहींची प्रकृती गंभीर असून त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या अपघातानंतर स्थानिक प्रशासन व आपत्कालीन मदत पथके ताबडतोब घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी बचावकार्य चालू केले.

केंद्र, राज्य हेल्पलाइन

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी नवी दिल्लीतील अधिकाऱ्यांना दूतावास अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यास सांगितले आहे. पीडित कुटुंबांना माहिती व मदत पुरवता यावी यासाठी तेलंगणा सचिवालयाने एक नियंत्रण कक्ष सुरू केला असून ७९९७९५९७५४ आणि ९९१२९१९५४५ हे दोन हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत, तर भारताच्या वाणिज्य दूतावासानेही अहोरात्र नियंत्रण कक्ष स्थापित केला आहे. वाणिज्य दूतावासाने ८००२४४०००३ हा टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे.

मोदींनी व्यक्त केले दु:ख

मदिना येथे भारतीय नागरिकांशी संबंधित झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकून मला खूप दुःख झाले आहे. ज्यांनी आपल्या नातेवाईकांना या दुर्घटनेत गमावले आहे, त्या सर्व कुटुंबांबाबत मी सहवेदना व्यक्त करतो. या दुर्घटनेत जे जखमी झाले आहेत ते त्वरित बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. रियाधस्थित भारतीय दूतावास व जेद्दाह येथील वाणिज्य दूतावास पीडित कुटुंबांना सर्व प्रकारे मदत करत आहेत. आपले अधिकारी सौदी अरेबियामधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. तसेच त्यांचे या स्थितीवर लक्ष आहे, असे त्यांनी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in