सावरकरांचे गोडसे याच्याशी कौटुंबिक संबंध; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा प्रतिज्ञापत्रात दावा

महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेशी स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांचे कौटुंबिक संबंध होते, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुण्यातील विशेष न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. हा महत्त्वाचा तपशील फिर्यादी सत्त्यकी सावरकर यांनी लपवल्याने न्यायालयापासून वस्तुस्थिती दडपल्याचा प्रकार घडला आहे, असे गांधी यांनी नमूद केल्याचे ‘लाईव्ह लॉ’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
सावरकरांचे गोडसे याच्याशी कौटुंबिक संबंध; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा प्रतिज्ञापत्रात दावा
Published on

मुंबई: महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेशी स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांचे कौटुंबिक संबंध होते, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुण्यातील विशेष न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. हा महत्त्वाचा तपशील फिर्यादी सत्त्यकी सावरकर यांनी लपवल्याने न्यायालयापासून वस्तुस्थिती दडपल्याचा प्रकार घडला आहे, असे गांधी यांनी नमूद केल्याचे ‘लाईव्ह लॉ’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

मुस्लिम तरुणाला मारहाण करण्यात सावरकरांना आनंद मिळाला होता,’ असे वक्तव्य राहुल गांधी यांनी लंडनमधील भाषणात केल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. त्यावर गांधी यांच्या वतीने वकील मिलिंद पवार यांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे, “सत्त्यकी हे अशोक सावरकरांचे पुत्र आहेत, जे विनायक सावरकरांचे पुतणे होते. हा तपशील फिर्यादीने नमूद केला आहे. मात्र, त्यांची आई हिमानी या गोपाळ गोडसे यांच्या कन्या आहेत. गोपाळ हे नथुराम गोडसे यांचे सख्खे बंधू असून, दोघांना महात्मा गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. हा महत्त्वाचा तपशील मात्र लपवण्यात आला आहे.”

या अर्जात पुढे म्हटले आहे की, सत्त्यकी सावरकर यांनी आपल्या पितृकुळाच्या वंशवृक्षाचा दाखला दिला असला तरी मातृकुळाचा उल्लेख केलेला नाही. “माहितीनुसार, त्यांची आई हिमानी या जन्मतःच गोडसे कुटुंबातील आहेत. हे असूनही त्यांनी मुद्दाम, योजनाबद्ध पद्धतीने आणि कुशलतेने हा भाग लपवला आहे. न्यायालयासमोर वस्तुस्थिती दडपणे हे गंभीर प्रकरण असून, त्यामुळे याचिका फेटाळून लावली जाऊ शकते किंवा दिलेला दिलासाही नाकारला जाऊ शकतो,” असा युक्तिवाद करण्यात आला आहे. गांधीहत्येच्या खटल्यात सुरुवातीला विनायक सावरकर हे सहआरोपी होते, मात्र, पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती, हेही सत्त्यकी सावरकर यांनी लपवले आहे, असे गांधी यांच्या अर्जात नमूद करण्यात आले आहे.

“गोडसे व सावरकर हे दोघेही 'हिंदू राष्ट्र' या संकल्पनेचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या मते, मुसलमान व ख्रिश्चन हे भारतासाठी 'अयोग्य' होते. गांधी हे मुसलमानांकडे कल असणारे म्हणून त्यांच्या हत्येचा कट रचलण्यात आला. सावरकर हे द्विराष्ट्र सिद्धांताचे पुरस्कर्ते होते, ज्यामध्ये हिंदू व मुसलमान हे वेगवेगळे राष्ट्र आहेत. ही भूमिका नंतर मुस्लिम लीगचे नेते मोहम्मद अली जिन्ना यांनीही घेतली, असेही अर्जात म्हटले आहे.

“१९३७ मध्ये सावरकरांनी मांडलेली ही भूमिका १९४३ मध्ये आणखी स्पष्ट झाली. हिंदू आणि मुसलमान समाज यांच्यातील अंतर व वेगवेगळे अस्तित्व या विचाराने पुढे भारताच्या फाळणीचा पाया तयार झाला,” असेही अर्जात म्हटले आहे. सावरकरांनी आपल्या लेखनात मुसलमानांविषयी द्वेषपूर्ण भूमिका घेतल्याचा दावा गांधी यांच्या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. “सावरकरांनी मुस्लिम नागरिकांना पोलिस आणि लष्करी सेवेत ठेवण्यास विरोध दर्शवला होता. त्यांच्या मते, हे देशासाठी संभाव्य गद्दार ठरू शकतात. त्यामुळे शस्त्रास्त्र कारखान्यांमध्ये मुस्लिमांची नेमणूक न करण्याची वकिली त्यांनी केली होती.”

राहुल गांधींच्या अर्जाला उत्तर देण्याचे निर्देश

विशेषतः सावरकर यांच्या १९६३ मधील Six Glorious Epochs of Indian History या पुस्तकातील एका वादग्रस्त उताऱ्याचा दाखला देत अर्जात म्हटले आहे, “ हिंदू धर्म नष्ट करण्याचा मुसलमान व ख्रिश्चन यांचा कट असल्याचा आरोप सावरकरांनी केला होता. त्यांनी लैंगिक हिंसेचा राजकीय अस्त्र म्हणून वापर करण्याची मांडणी केली होती. याप्रकरणात न्यायाधीश अमोल शिंदे यांनी सत्त्यकी सावरकर यांना राहुल गांधींच्या अर्जाला उत्तर देण्याचे निर्देश दिले असून, पुढील कार्यवाही प्रलंबित आहे.

logo
marathi.freepressjournal.in