"३ वर्षांचा सुखी संसार..." राज्यपालांच्या कार्यपद्धतीवर सरन्यायाधीशांनी ओढले ताशेरे
आज राज्याच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यादरम्यान, तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वकिलाने आपला युक्तिवाद मांडला. यावेळी ३ वर्ष एकत्र सत्तेत होते, मात्र ३ वर्षाचा सुखी संसार एका रात्रीत मोडला का? असा सवाल सरन्यायाधीशांनी उपस्थित केला. तसेच, सरकार पडेल असे कृत्य राज्यपालांनी करायला नको होते, अशी टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली. यावेळी न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.
सर्वोच्च न्यायालायने म्हंटले की, "आपल्याकडे ३ वर्षानंतर अचानक हे लोक कसे आले? असा प्रश्न राज्यपालांना आधी स्वतःला विचारायला हवा होता. निवडून आल्यानंतर ३ वर्षे सुरळीत चाललेल्या सरकारमध्ये गट कसे पडू शकतात?" असा सवाल न्यायालयाने विचारला. तसेच, या सगळ्या घटना सरकार निवडून आल्यानंतर १ महिन्यात नाही, तर ३ वर्षानंतर घडल्या याचा विचार व्हायलाच हवा होता, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.
"शिवसेना पक्षातील आमदारांचा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाण्यास विरोध, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न होता. अशावेळी राज्यपाल बहुमत चाचणीचे निर्देश देऊ शकतात का? राज्यपालांच्या या निर्णयामुळे सरकार पडण्यास मदत झाली नाही का?" असेदेखील मत न्यायालयाने व्यक्त केले.