भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारांची चाचपणी

२०१९ साली भाजपने १५८ पैकी ५५ पहिल्यांदाच खासदार झालेल्यांना तिकीट दिले नव्हते
भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारांची चाचपणी
Published on

नवी दिल्ली : आगामी लोकसभा २०२४ निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असतानाच भाजपने आपल्या विद्यमान खासदारांपैकी कुणाकुणाला आगामी लोकसभेचे तिकीट द्यायचे, याबाबतची चाचपणी सुरू केली आहे. भाजप सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी पक्षांतर्गत व्यवस्थेप्रमाणेच बाह्य संस्थांकडून सेवा देखील घेण्यात येणार आहे. प्रत्येक खासदारांचे जनसंपर्काचे प्रयत्न, जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी याआधी घेतलेला सहभाग आणि त्यांची समाजमाध्यमातील मतदात्यांमधील प्रतिमा या बाबी तपासून पाहण्यात येणार आहेत. अनेक केंद्रीय मंत्री राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांना लोकसभेचे तिकीट देण्याचा भाजप विचार करीत असल्याचे पक्षाच्या उच्च पातळीवरील नेतृत्वाकडून समजले आहे. अर्थात त्यांची जिंकण्याची क्षमता पाहूनच त्यांना तिकीट दिले जाणार आहे. भाजप गेल्या निवडणुकीत गमावलेल्या १६० जागांवर लढा देण्यासाठी एक खास मोहीम आखत आहे. त्यासाठी ४० विभाग करण्यात आले असून, त्यांची जबाबदारी केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ नेत्यांकडे सोपवण्यात आली आहे. अनेक लोकसभेच्या जागांवरील खासदारांनी वयाची सत्तरी ओलांडली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी तरुणांना संधी देण्याचाही विचार केला जात आहे. २०१९ साली भाजपने १५८ पैकी ५५ पहिल्यांदाच खासदार झालेल्यांना तिकीट दिले नव्हते. त्यापैकी ३५ टक्के उमेदवार मोदीलाटेमुळे निवडून आले होते, असा अंदाज लावण्यात आला होता. त्यांनी आपल्या मतदारसंघात छाप पडेल असे काहीही काम केले नाही, असे पक्षाचे म्हणणे आहे.

logo
marathi.freepressjournal.in