'पंप-अँड-डम्प' गैरव्यवहार: SEBI कडून २२१ संस्थांवर ७ वर्षांपर्यंत बंदी, सूत्रधार हनिफ शेखला १० कोटींचा दंड

२०१७ ते २०२० दरम्यान पाच कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर 'पंप-अँड-डम्प' (किंमती कृत्रिमरित्या वाढवणे आणि नंतर शेअर्स विकून नफा कमावणे) गैरव्यवहार केल्याबद्दल भांडवल बाजार नियामक 'सेबी'ने कडक पाऊल उचलले आहे.
'पंप-अँड-डम्प' गैरव्यवहार: SEBI कडून २२१ संस्थांवर ७ वर्षांपर्यंत बंदी, सूत्रधार हनिफ शेखला १० कोटींचा दंड
'पंप-अँड-डम्प' गैरव्यवहार: SEBI कडून २२१ संस्थांवर ७ वर्षांपर्यंत बंदी, सूत्रधार हनिफ शेखला १० कोटींचा दंड
Published on

नवी दिल्ली : २०१७ ते २०२० दरम्यान पाच कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर 'पंप-अँड-डम्प' (किंमती कृत्रिमरित्या वाढवणे आणि नंतर शेअर्स विकून नफा कमावणे) गैरव्यवहार केल्याबद्दल भांडवल बाजार नियामक 'सेबी'ने कडक पाऊल उचलले आहे. सेबीने मुख्य सुत्रधार व वैयक्तिक गुंतवणूकदार हनिफ शेखसह २२१ संस्था व व्यक्तींवर ७ वर्षांपर्यंत शेअर बाजारात व्यवहार करण्यास बंदी घातली आहे, तसेच हनिफ शेखला १० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाने (सेबी) मंगळवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हनिफ शेख आणि त्याच्याशी संबंधित इतर संस्थांनी मौरिया उद्योग लि., ७एनआर रिटेल, दार्जिलिंग रोपवे कंपनी, जीबीएल इंडस्ट्रीज आणि विशाल फॅब्रिक्स लि. या पाच कंपन्यांच्या शेअर्समध्ये फेरफार केला होता.

सेबीने ३९४ पानांच्या अंतिम आदेशात नमूद केले आहे की, शेखने एक फसवणुकीची योजना आखली होती. यामध्ये वरवर पाहता एकमेकांशी संबंध नसलेल्या परंतु अंतर्गत जोडलेल्या २०० हून अधिक संस्थांनी 'पीव्ही इन्फ्लुएन्सर्स', 'सहयोगी' किंवा 'ऑफलोडर्स' म्हणून काम केले. याद्वारे बेकायदेशीरपणे कमावलेला नफा कंपन्यांच्या प्रवर्तकांकडे किंवा शेखच्या नियंत्रणाखालील संस्थांकडे वर्ग करण्यात आला.

यापूर्वी जून २०२३ मध्ये सेबीने एका अंतरिम आदेश आणि कारणे दाखवा नोटीशीद्वारे हनिफ शेख आणि इतर २२५ संस्थांवर बंदी घातली होती, तसेच पाच कंपन्यांच्या शेअर्समधील फेरफारातून कमावलेला १४३.७९ कोटी रुपयांचा कथित बेकायदेशीर नफा जप्त करण्याचे निर्देश दिले होते.

अशी केली फसवणूक :

कृत्रिम भाववाढ : संशयास्पद आणि आपापसात ठरवून केलेल्या व्यवहारांद्वारे शेअर्सच्या किंमती आणि ट्रेडिंग व्हॉल्यूम कृत्रिमरित्या वाढवले गेले.

बल्क एसएमएस : सर्वसामान्य आणि अनभिज्ञ गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोबाईलवर शेअर्स खरेदीच्या शिफारसींचे एसएमएस पाठवले गेले.

शेअर्सची विक्री : शेअर्सच्या किंमती वाढताच वरच्या पातळीवर हे शेअर्स विकून नफा कमावला गेला.

पैशांची हेराफेरी : मुख्य लाभार्थी कोण आहे हे लपवण्यासाठी हा नफा अनेक मध्यस्थ संस्थांमार्फत फिरवला गेला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in