

नवी दिल्ली : भागधारकांकडून शेअर्सच्या पुनर्खरेदीदरम्यान (बायबॅक) प्रवर्तकांचे शेअर्स आंतरराष्ट्रीय रोखे ओळख क्रमांकाच्या (आयएसआयएन) स्तरावर गोठवण्याच्या (फ्रीझ) नवीन यंत्रणेची अंमलबजावणी करण्यासाठी १ ऑगस्टपर्यंत आवश्यक कार्यप्रणाली आणि प्रणालीत आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश भांडवली बाजार नियामक सेबीने मंगळवारी डिपॉझिटरीजना दिले आहेत.
सेबीने डिपॉझिटरीजना प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाच्या धारणांवर आयएसआयएन स्तरावर फ्रीझ लागू करण्याबाबतची कार्यप्रणाली मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यास सांगितले आहे. सूचीबद्ध कंपन्यांनी फ्रीझ करण्याच्या सूचना देण्याच्या फॉरमॅटचाही समावेश आहे.
टेंडर ऑफरद्वारे चालवल्या जाणाऱ्या बायबॅकमध्ये प्रवर्तकांना शेअर्स सादर करण्याची परवानगी देण्यासाठी, तसेच बायबॅक कालावधी सुरू होण्यापूर्वी निर्माण केलेल्या दायित्त्वांचे (गहाण/बोजा) निरसन करण्याची किंवा ते मागे घेण्याची परवानगी देण्यासाठीही ही कार्यप्रणाली नियमावली निश्चित करेल.
अशा प्रकरणांमध्ये, निरसन केलेल्या किंवा मागे घेतलेल्या शेअर्सवर किंवा इतर विशिष्ट रोख्यांवर फ्रीझ लागू राहणे सुरूच राहील. डिपॉझिटरीजने १ ऑगस्ट २०२६ पूर्वी कार्यप्रणाली आणि आवश्यक प्रणालीतील सुधारणा पूर्ण केल्या आहेत याची खात्री करावी, असे सेबीने म्हटले आहे.
नियामकाने १ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनंतर हे परिपत्रक आले आहे. सुधारित नियमांनुसार, संचालक मंडळ किंवा भागधारक बायबॅकला मंजुरी देतात त्या तारखेपासून ते ऑफर बंद होईपर्यंत प्रवर्तक आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रवर्तक गटाची धारणा आयएसआयएन स्तरावर गोठवलेली राहील.
प्रवर्तकांच्या समभागांवर निर्बंध
पुनर्खरेदीच्या काळात बाजारात संभाव्य गैरव्यवहार रोखण्यासाठी प्रवर्तकांचे शेअर्स गोठवले जातील.
आयएसआयएन स्तरावरील नियंत्रण : आंतरराष्ट्रीय रोखे ओळख क्रमांकाच्या स्तरावर थेट डिजिटल पद्धतीने ही रोख लावली जाईल.
पारदर्शकता आणि सुरक्षा: लहान भागधारकांच्या हितरक्षणासाठी, प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
म्युच्युअल फंड विक्रीसाठी एकच परीक्षा
म्युच्युअल फंड आणि विशेष गुंतवणूक निधीच्या विक्री आणि वितरणासाठी व्यक्तींच्या पात्रता अटी सुलभ करण्याच्या उद्देशाने भांडवली बाजार नियामक सेबीने मंगळवारी एकाच प्रमाणपत्र परीक्षेची सुरुवात केली आहे. नवीन चौकटीनुसार, विशेष गुंतवणूक निधी उत्पादनांच्या विक्री आणि/किंवा वितरणात कार्यरत, गुंतलेल्या कोणत्याही व्यक्तीकडे वैध एनआयएसएम सीरिज व्ही-डी- म्युच्युअल फंड-स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड डिस्ट्रिब्युटर्स सर्टिफिकेशन असणे आवश्यक असेल. नवीन प्रमाणपत्र धारण करणाऱ्या व्यक्ती म्युच्युअल फंड, एसआयएफ उत्पादनांचे वितरण करण्यास पात्र असतील. यामुळे एनआयएसएम सिरीज व्ही-ए - म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर्स सर्टिफिकेशन वेगळे मिळवण्याची गरज भासणार नाही.