इंडिया आघाडीला दुसरा झटका,जेडीयू पाठोपाठ आपकडून उमेदवाराची घोषणा

नितीश कुमार यांनी अरुणाचल प्रदेशात आपला उमेदवार जाहीर केला. त्यापाठोपाठ आता आम आदमी पक्षाकडून गुजरातमध्ये आपला लोकसभा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.
इंडिया आघाडीला दुसरा झटका,जेडीयू पाठोपाठ आपकडून उमेदवाराची घोषणा

नवी दिल्ली : भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत चारीमुंड्या चीत करण्यासाठी देशपातळीवर आव्हान देता यावे, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या २८ विरोधकांच्या इंडिया आघाडीत एकजूट कमी आणि मतभेदच अधिक दिसू लागले आहेत.

इंडिया आघाडीचे जागावाटप जाहीर करण्यास विलंब होत असल्यामुळे नितीश कुमार यांनी अरुणाचल प्रदेशात आपला उमेदवार जाहीर केला. त्यापाठोपाठ आता आम आदमी पक्षाकडून गुजरातमध्ये आपला लोकसभा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.

दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीसाठी गुजरातमधील भरुच मतदारसंघातून आपला उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे.

आम आदमी पक्षाचे आमदार चैत्रा वसावा यांना आपने भरुच लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, अद्याप आघाडीतील जागांचे वाटप झालेले नाही. अशा परिस्थितीत इंडिया आघाडीतील पक्ष आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करत आहेत. यापूर्वी जनता दल युनायटेडने अरुणाचल प्रदेशच्या पश्चिम लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रुची तांगुक, यांना तिकीट देण्याची घोषणा केली आहे.

गुजरातमधील नेत्रंग येथे एका सभेला संबोधित करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘‘आज मी जाहीर करतोय की, चैत्र वसावा आम आदमी पार्टीच्या वतीने भरुच मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. वसावा यांना जामीन मिळाला नाही, तर ते तुरुंगातीन लोकसभेची निवडणूक लढवतील.’’

गुजरातमधील डेडियापाडा येथील आप आमदार चैत्रा वसावा वन विभागाशी संबंधित एका प्रकरणात तुरुंगात आहेत. भाजपवर कठोर टीका करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, "आदिवासी समाजाचे नेते चैत्रा वसावा यांना भाजपच्या सांगण्यावरुन अटक केली. ते मला धाकट्या भावासारखे आहेत. सर्वात दुःखाची बाब म्हणजे वसावा यांच्या पत्नीलाही अटक करण्यात आली. ही संपूर्ण आदिवासी समाजाचा अवमान करणारी बाब आहे. डाकूंचाही धर्म होता, पण भाजपवाले त्या डाकूंपेक्षाही वाईट आहेत. चैत्र वसावा वाघ आहेत, त्यांना फार काळ पिंजऱ्यात ठेवता येत नाही," असे केजरीवाल म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in