"सीमा हैदर अनेकदा पाकिस्तानी आर्मी कँम्पमध्ये जायची; ती कम्प्युटर वापरण्यातही पटाईत"; खळबळजनक दावा

सीमा हैदरच्या पाकिस्तानस्थित पती गुलाम हैदरच्या जवळच्या व्यक्तीने सीमाबद्दल धक्कादायक माहिती उघड केली आहे.
"सीमा हैदर अनेकदा पाकिस्तानी आर्मी कँम्पमध्ये जायची; ती कम्प्युटर वापरण्यातही पटाईत"; खळबळजनक दावा
Published on

सीमा हैदर आणि तिचा पती सचिन मीणा हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्यांच्या वादग्रस्त प्रेमकहाणीपासून ते लग्नापर्यंत हे जोडपे सतत चर्चेत असते. आता सीमा हैदरच्या पाकिस्तानस्थित पती गुलाम हैदरच्या जवळच्या व्यक्तीने सीमाबद्दल धक्कादायक माहिती उघड केली आहे. ही व्यक्ती पाकिस्तानमध्ये राहते आणि सीमा व्यतिरिक्त तिचा पती गुलाम हैदरलाही चांगली ओळखते. शिवाय, ही व्यक्ती गुलाम हैदर यांचे भारतातील वकील मोमीन मलिक यांच्याही संपर्कात आहे.

'दैनिक भास्कर'च्या वृत्तानुसार, सीमा आणि गुलाम हैदर या दोघांशीही परिचित असलेल्या या व्यक्तीने सीमाच्या वारंवार पाकिस्तानला जाण्यावर आणि पाकिस्तानी सैन्यात तिच्या कुटुंबाच्या सहभागाबद्दल खुलासा केला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, सीमा अनेकदा पाकिस्तानी लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रांना भेट देत असे. तिचे काका, गुलाम अकबर हे तेथे प्रशिक्षण देतात. मोमीम यांनी माहिती देणाऱ्याची ओळख उघड केली नसली तरी ही माहिती न्यायालयात मांडण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंग दैनिक भास्करकडे उपलब्ध आहे.

सीमा हैदरबाबत धक्कादायक खुलासे

सीमाच्या तांत्रिक ज्ञान आणि कौशल्याविषयी धक्कादायक खुलासे झाले आहेत. या व्यक्तीने सांगितल्यानुसार, जेव्हाही त्यांचा फोन बिघडायचा तेव्हा सीमा स्वतःच त्याचा फोन दुरुस्त करत असे. ती एवढी माहिर झाली होती की बॅन असतानाही तिने टिकटॉक वापरणे सुरू ठेवले होते. सीमाने भारतातील सचिनशी PUBG खेळताना ओळख झाल्याचा दावा केला होता, पण तिला पबजीबद्दल माहितीच नव्हते. ती खोटं बोलतेय. सीमा कम्प्युटर वापरण्यातही पटाईत होती, ती तिच्यासोबत एक घेऊनही आली होती. माझ्याकडे अजूनही तिचा कम्प्युटर आहे. तिने त्याची तोडफोड करून दिला होता.

अटक टाळण्यासाठी मुलांना आणले सोबत

तिला तुरुंगात टाकले जाण्याची शक्यता असल्याने तिने आपल्या मुलांना तिच्यासोबत भारतात जाणूनबुजून आणले. हद्द ओलांडताना तिला पकडले गेले. त्यावेळी चौकशी आणि अटक टाळण्यासाठी तिने मुद्दाम आपल्या मोठ्या मुलीला पोलिसांसमोर उलट्या करायला लावल्या. त्या घटनेनंतर पोलिसांनी अधिक चौकशी न करता ते तिथून निघून गेले.

याआधी सीमा दोनदा भारतात आली होती

गुलाम हैदरचे वकील मोमीन मलिक यांच्या म्हणण्यानुसार सीमा पाकिस्तानातून दोनदा भारतात आली होती. पहिल्यांदा ती एकटी आली होती, त्यानंतर तिच्या मुलांसोबत आली. न्यायालयात गरज पडल्यास ते या भेटींचे पुरावे देऊ शकतात असेही मोमीन यांनी सांगितले. दरम्यान, दोघांमधील संभाषणाचा ऑडियोही उपलब्ध असल्याचे दै.भास्करने म्हटले आहे. हा नवा खुलासा झाल्यामुळे सीमा हैदरबाबत पुन्हा एकदा अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in