
पाकिस्तानी सीमा हैदरने भारतात आश्रय घेतल्यानंतर पाकिस्तानमध्ये हिंदू आणि हिंदू धर्मीयांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. पाकिस्तानमध्ये एका टोळीने हिंदू मंदीरांवर हल्ला करत अंदाधुंद गोळीबार केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये एका टोळीनं हिंदू मंदिरावर रॉकेट लॉंचरने हल्ला केला. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील डाकूंनी हिंदू प्रार्थनास्थलांवर आणि हिंदू समुदायावर हल्ला करण्याची धमकी दिली होती.
१६ जुलै रोजी पाकिस्तानच्या दक्षिण सिंध प्रांतात दरोडेखोरांच्या एका टोळीने हिंदू मंदिरावर रॉकेट लॉंचरने हल्ला केला. एका पोलीस अधिकाऱ्यांने यासंबंधित माहिती दिली आहे. यावेळी हल्लेखोरांनी हिंदू समुदायाच्या सदस्यांच्या घरांवर देखील हल्ला केला. याबागात गोळीबार देखील करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. सीमा हैदरने भारतात येऊन हिंदू धर्म स्वीकारत हिंदू तरुणाशी लग्न केल्यामुळे हा हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे.
गेल्या ४८ तासांमध्ये हिंदू मंदिरावर हल्ला करुन तोडफोड केल्याची ही दुसरी घटना आहे. याआधी शुक्रवारी रात्री कराचीमध्ये १५० वर्ष जुने हिंदू मंदिर पाडण्यात आलं होतं. तर मारी मारी माता मंदिरावर बुलडोझर चालवण्यात आल्याचं स्थानिकांनी सांगितलं होतं.