
संपूर्ण जगावर कोरोना महामारीचे संकट पुन्हा एकवार घोंगावू लागले आहे. रशिया, तैवानसह बहुसंख्य देशांमध्ये कोरोनाने डोके वर काढले आहे. भारतात दररोज चार हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळत असून या पार्श्वभूमीवर केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि तेलंगण या पाच राज्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड व पुणे या सहा जिल्ह्यांत कोरोनारुग्णांची संख्या वाढत असून, या जिल्ह्यांत तीन ते आठ टक्के पॉझिटिव्हिटी दर आहे. कोरोना चाचण्यांमध्ये रुग्णबाधित आढळत असले, तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण चार टक्क्यांवर गेले आहे. त्यामुळे या सहा जिल्ह्यांत कोरोना चाचण्या कठोरपणे वाढवण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. २०२०मध्ये मुंबईतील झोपडपट्ट्यांपेक्षा उच्चभ्रू वस्तीत कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणावर झाला होता. अगदी तशीच परिस्थिती आता पुन्हा उद्भवली आहे. मुंबईतील अंधेरी, ग्रँटरोड, वांद्रे हे भाग कोरोनाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. अंधेरी पश्चिम येथे ५८४, ग्रँटरोड येथे ३९७ व वांद्रे पश्चिम येथे ३४६ सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत. भारतात मार्च २०२०मध्ये पहिल्या, ऑगस्ट २०२०मध्ये दुसऱ्या, तर डिसेंबर २०२१मध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने धडक दिली होती. या तिन्ही लाटा धडकल्या, त्यावेळी प्रामुख्याने उच्चभ्रू वस्तीतच कोरोनाचा फैलाव झपाट्याने झाला होता. तथापि, राज्य सरकार व मुंबई महापालिकेच्या योग्य उपचार पद्धतीमुळे तिसरी लाट एप्रिल २०२२मध्ये थोपविण्यात यश आले होते. आता कोरोना महामारीच्या चौथ्या लाटेने मुंबईला धडका देण्यास सुरुवात केली असून पुनश्च उच्चभ्रू वस्त्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. अंधेरी पश्चिम परिसरात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदली गेली आहे. कोरोना आल्यापासून आतापर्यंत या ठिकाणी तब्बल ९१ हजार २५ रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही झपाट्याने कमी होत चालला आहे. २० मे रोजी मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी तब्बल चार हजार ४३३ दिवस होता. यामध्ये मोठी घट होऊन सध्या रुग्णदुपटीचा कालावधी १,२०४ दिवसांवर आला आहे. सर्वाधिक रुग्ण असलेल्या अंधेरी पूर्वमध्ये रुग्णदुपटीचा कालावधी १,५२६ दिवस, अंधेरी पश्चिममध्ये ७८६ दिवस आहे, तर ग्रँटरोडमध्ये ७३१ दिवस आहे. वांद्रे पश्चिममध्ये सर्वात कमी म्हणजे रुग्णदुपटीचा कालावधी ६४८ दिवसांपर्यंत खाली आला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेप्रमाणे याहीवेळी कोरोनाने बॉलिवूडला विळखा घातला असून, अभिनेता शाहरूख खान, कतरिना कैफ, कार्तिक आर्यन हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. अशाप्रकारे करण जोहरची बर्थडे पार्टी कोरोनाची सुपर स्प्रेडर ठरली आहे. त्यामुळे उच्चभ्रू लोकवस्तीतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे मुंबई महापालिकेसमोर मोठे आव्हान आहे. दुसरीकडे पंढरपूरच्या वारीसंबंधीचा विषय फार पुढे गेला असल्याने त्यावर निर्बंध घालणे योग्य होणार नाही. वारीत १० ते १५ लाख वारकरी सहभागी होतात. त्यामुळे यंदाची वारी होईल त्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्यविषयक टास्क फोर्सची बैठक घेऊन राज्यातील कोरोना महामारीच्या परिस्थितीचा नुकताच आढावा घेतला आहे. या बैठकीत कोरोना महामारीचा फैलाव होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्याचे ठरविण्यात आले असून, तशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील आरोग्य यंत्रणा पुन्हा सक्रिय झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकास्तरावर कोरोना रुग्णसंख्येचा नियमित आढावा, औषधांचा पुरेसा साठा, कोरोनापीडितांवर वेळीच उपचार, बूस्टर डोसची व्याप्ती वाढविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नागरिकांनीही कोरोनाची नवी लाट थोपविण्यासाठी सरकारला सहकार्य करणे अपेक्षित आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागली आहेत, त्यांनी सार्वजनिक ठिकाणी विशेषत: गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायला हवे. तसेच, ज्यांनी कोरोनाचे डोस घेतलेले नाहीत, त्यांनीही ते वेळीच घेण्याची गरज आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क लावणे अद्याप अनिवार्य करण्यात आले नसले, तरी स्वयंशिस्त म्हणून प्रत्येकाने विशेष खबरदारी घेण्याची तितकीच आवश्यकता आहे. प्रत्येक मुद्द्यावर सक्ती करण्यापेक्षा नागरिकांनी स्वत:हून बस, रिक्षा, टॅक्सी, रेल्वेतून प्रवास करताना मास्क लावून स्वत:ची काळजी स्वत:च घेणे अधिक महत्त्वाचे आहे. या संकटकाळात प्रत्येक नागरिकांनी दाखविलेली ही स्वयंशिस्तच राज्यासह देशाला पुन्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने नेईल, ही अपेक्षा.