जागीरोड : टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा २७ हजार कोटी रुपयांचा सेमीकंडक्टर प्रकल्प २०२५ पासून आसाममध्ये कार्यान्वित होणार आहे, अशी घोषणा टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी केली. या प्रकल्पामुळे २७ हजार रोजगार निर्माण होणार आहेत.
सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, आसामच्या १ हजार जणांना कंपनीने नोकरी दिली आहे. सेमीकंडक्टर यंत्रणेशी संबंधित अन्य कंपन्यांमध्येही आसामी तरुणांना रोजगार देण्याबाबत पावले उचलली जातील. या प्रकल्पातून २७ हजार जणांना रोजगार दिला जाणार आहे. त्यात १५ हजार जणांना प्रत्यक्ष, तर १२ हजार जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. आम्हाला वेगाने काम करायचे असून फॅक्टरी उभारण्याच्या कामाला गती दिली जाणार आहे. २०२५ पर्यंत ही फॅक्टरी तयार होऊन त्यातून उत्पादन सुरू केले जाईल, असे ते म्हणाले.
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिश्व सर्मा म्हणाले की, आसाममध्ये सेमीकंडक्टर प्रकल्पाचे भूमिपूजन होणे हा राज्यासाठी सुवर्ण दिवस आहे. ही कंपनी उभी राहण्यासाठी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. या प्रकल्पामुळे राज्यातील उद्योगांना चालना मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.