
नितीशकुमार यांनी भाजप आणि ‘एनडीए’सोबतचे नाते तोडल्याने भाजपला धक्का बसला आहे. नितीश यांच्या या अफलातून खेळीनंतर भाजपकडून तिखट प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. बिहारचे ज्येष्ठ भाजप नेते आणि खासदार सुशील मोदी म्हणाले की, “ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांनाच आम्ही तोडले. महाराष्ट्रात शिवसेनेने आमचा विश्वासघात केला असून त्याचे परिणाम ते भोगत आहेत.”
सुशील मोदी पुढे म्हणाले की, “भाजपमध्ये असताना त्यांना (नितीशकुमार) जो सन्मान मिळाला होता, तो राजदसोबत त्यांना मिळणार नाही. जास्त जागा असूनही आम्ही त्यांना मुख्यमंत्री केले आणि त्यांचा पक्ष फोडण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांनाच आम्ही तोडले आहे.”
२०२४ला भाजप प्रचंड बहुमताने येणार
“नितीशजींच्या संमतीशिवाय भाजपने आरसीपींना मंत्री केले हे शुद्ध खोटे आहे. भाजपला जेडीयूत फूट पाडायची होती हेही खोटे आहे. ते युती तोडण्यासाठी निमित्त शोधत होते; मात्र २०२४ला भाजप प्रचंड बहुमताने येणार आहे,” असे सुशील मोदी म्हणाले.