नवी दिल्ली : कोविड काळापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेच्या तिकिटात ५० टक्के सवलत दिली जात होती. ही सवलत कोविडपश्चात रेल्वेने रद्द केली. ही रद्द झालेली सवलत पुन्हा सुरू करण्यासाठी विविध संघटना, राजकीय पक्षांनी मागणी केली. तरीही रेल्वे तिकिटावरील ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी सवलत सुरू झालेली नाही. मात्र, आता रेल्वेच्या स्थायी समितीनेच ज्येष्ठांना शयनयान, ‘थर्ड एसी’च्या तिकिटात सवलत द्यावी, असा सल्ला दिला आहे. राज्यसभेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ज्येष्ठांना शयनयान, ‘थर्ड एसी’च्या तिकिटात सवलत देण्यात यावी, असा सल्ला रेल्वेच्या स्थायी समितीने दिला आहे.
रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना पूर्वीची तिकिटातील सवलत पुन्हा सुरू करावी, अशी मागणी काही खासदारांनी केली. रेल्वेच्या संसदीय समितीच्या शिफारसी पाहाव्यात, असे खासदारांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात सवलत का दिली जात नाही, या लेखी प्रश्नाच्या उत्तरात वैष्णव म्हणाले की, भारतीय रेल्वे किफायतशीर भाड्यात सेवा देत आहे. २०२३-२४ मध्ये ६०,४६६ कोटींचे अनुदान प्रवाशांना दिले. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाकडून रेल्वे सरासरी ४५ टक्केच भाडे घेते. उदा. १०० रुपये तिकीट असल्यास त्याचे केवळ ५५ रुपये घेतले जाते. हे अनुदान सर्वच प्रवाशांना दिले जाते. या सवलतीखेरीज दिव्यांगांसह ४ श्रेणीतील प्रवाशांना तिकिटात सवलत दिली जाते. यात ११ श्रेणीतील रुग्ण व ८ प्रकारच्या विद्यार्थ्यांना सवलत दिली जाते, असे ते म्हणाले.
रेल्वेच्या १,०७८ हेक्टर जमिनीवर अतिक्रमण
रेल्वेकडे ४.९० लाख हेक्टर जमीन आहे. त्यापैकी १,०७८ हेक्टर भूमीवर अतिक्रमण झाले आहे, तर ४,८३० हेक्टर जमिनीचा व्यापारी तत्त्वावर उपयोग करण्यात आला आहे. व्यापारी तत्त्वावरील जमिनीतून रेल्वेला २०१९-२० मध्ये २,१०४.४४ कोटी रुपये, २०२०-२१ मध्ये १,७३३.२४ कोटी, २०२३-२४ मध्ये २,६९९.८७ कोटी, तर २०२४-२५ मध्ये ३,१२९.४९ कोटी रुपये महसूल मिळाला, असे रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले.