वरिष्ठ, लहान मुले अन् सहव्याधींनी काळजी घ्यावी पॅनिक होण्याची गरज नाही, फंक्शन टाळावे - डॉ. रमण गंगा खेडकर

ओमायक्रॉनचा उपप्रकार जेएन १ व्हेरिएंटचा देशात झपाट्याने प्रसार होत आहे. राज्यातही या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत.
वरिष्ठ, लहान मुले अन् सहव्याधींनी काळजी घ्यावी पॅनिक होण्याची गरज नाही, फंक्शन टाळावे - डॉ. रमण गंगा खेडकर

मुंबई : देशांत जेएन-१ व्हेरिएंटचे ७५२ रुग्ण आढळले असून चार जण दगावले. जेएन-१ नवीन व्हेरिएंटचा झपाट्याने प्रसार होत असला तरी लोकांनी पॅनिक होण्याची गरज नाही. परंतु वरिष्ठ नागरिक, लहान मुले व सहव्याधींनी त्रस्त लोकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आयसीएमआरच्या साथ व संसर्गजन्य रोग विभागाचे माजी प्रमुख व टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. रमण गंगा खेडकर यांनी केले आहे.

जेएन-१ व्हेरिएंट हा ओमायक्रॉनचा उपप्रकार आहे. जेएन-१ व्हेरिएंटचा प्रसार झपाट्याने होत असला तरी घाबरण्याचे कारण नाही. कोरोनाचा उपप्रकार ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार झाला, त्यावेळी एका बाधित रुग्णामुळे किती जण बाधित होऊ शकतात, याचा अंदाज लावणे कठीण होते. त्याच प्रमाणे जेएन-१ व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णामुळे किती जण बाधित होऊ शकतात हे सांगणे कठीण आहे. परंतु लक्षणे नसलेले आणि जेएन-१ व्हेरिएंटची लागण झालेले, परंतु चाचणी न केल्याने जेएन-१ व्हेरिएंटचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे जेष्ठ नागरिक, सहव्याधी असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, कार्यक्रम, समारंभात जाणे टाळावे, असे आवाहन डॉ. रमण गंगा खेडकर यांनी केले आहे.

जेएन व्हेरिएंटचा प्रसार होत असला तरी रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण, जेएन व्हेरिएंटची लागण होऊन मृत्यू झाल्याचे प्रमाण कमी आहे. तरीही कोरोना काळात लोकांनी सूचनांचे पालन केले, त्या प्रमाणे आताही खबरदारी घ्यावी. हात स्वच्छ धुवावेत, गर्दीत जाणे टाळा, ताप, खोकला सर्दी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

ओमायक्रॉनचा उपप्रकार जेएन १ व्हेरिएंटचा देशात झपाट्याने प्रसार होत आहे. राज्यातही या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. जेएन १ व्हेरिएंटचा प्रसार झपाट्याने होत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जनतेला केले असून मुंबई महापालिकेसह राज्यातील विविध रुग्णालयांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने खबरदारी घेतली असून रुग्णालयांना अलर्ट मोड वर ठेवले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in