
जागतिक बाजारातील नकारात्मक कल आणि बँकांसह अन्य क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांच्या जोरदार विक्रीमुळे भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी नकारात्मक वातावरण होते. मुंबई शेअर बाजारात सोमवारी सेन्सेक्स ८७२ अंकांनी कोसळला. सेन्सेक्स आणि निफ्टी १ टक्क्यांहून अधिक घसरला. दरम्यान, भारतीय चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये फारसा बदल झाला नाही. सोमवारच्या व्यवहारात सकाळी घसरण झाल्यानंतर रुपया सावरुन ७९.८४वर बंद झाला.
दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स सोमवारी सकाळी घसरणीने उघडला आणि ८७२.२८ अंक किंवा १.४६ टक्के घसरुन ५८,७७३.८७वर बंद झाला. दिवसभरात तो ९४१.०४ अंक किंवा १.५७ टक्के घसरुन ५८,७०५.११ ही किमान पातळी गाठली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी २६७.७५ अंक किंवा १.५१ टक्के घसरुन १७,४९०.७०वर बंद झाला.
सेन्सेक्सवर्गवारीत टाटा स्टील, एशियन पेंटस्, लार्सन अॅण्ड टुब्रो, विप्रो, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, टेक महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक आणि ॲक्सीस बँक यांच्या समभागात घसरण झाली. तर आयटीसी, नेस्ले इंडिया यांच्या समभागात वाढ झाली.
आशियाई बाजारात सेऊल, टोकियोमध्ये घट तर शांघायमध्ये वाढ झाली होती. युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत घसरण तर वॉल स्ट्रीट शुक्रवारी घसरणीने बंद झाला होता.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.९५ टक्का घसरुन प्रति बॅरलचा भाव ९५.८० अमेरिकन डॉलर्स झाला. तर विदेशी गुंतवणूक संस्थांनी शुक्रवारी १,११०.९० कोटींच्या समभागांची खरेदी केली.