दक्षिण भारतात पाण्याची भीषण टंचाई, केवळ १७ टक्के जलसाठा; महाराष्ट्र, गुजरातमध्येही परिस्थिती भीषण

देशात उष्णतेची लाट पसरलेली असतानाच पाण्याची टंचाईही सुरू झाली आहे. विशेषत: दक्षिण भारतातील राज्यांमध्ये भीषण पाणी संकट उभे ठाकले आहे.
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

चेन्नई : देशात उष्णतेची लाट पसरलेली असतानाच पाण्याची टंचाईही सुरू झाली आहे. विशेषत: दक्षिण भारतातील राज्यांमध्ये भीषण पाणी संकट उभे ठाकले आहे. दक्षिण भारतात केवळ १७ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे, अशी माहिती केंद्रीय जल आयोगाने दिली. पावसाळा सुरू व्हायला आणखी दीड महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागण्याची शक्यता आहे.

दक्षिण भारतातील राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ व तामिळनाडूचा समावेश होतो. केंद्रीय जल आयोगाने गुरुवारी दक्षिण भारतातील जलसाठ्याची माहिती जारी केली. या आयोगाच्या अंतर्गत ४२ जलाशय असून त्यांची क्षमता ५३.३३४ अब्ज घनमीटर आहे. आता या जलाशयात केवळ ८.८६५ अब्ज घनमीटर पाणी उरले आहे. म्हणजेच एकूण क्षमतेच्या केवळ १७ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे.गेल्यावर्षी दक्षिण भारतातील पाण्याचा साठा २९ टक्के होता, तर दहा वर्षांतील सरासरी पाण्याचा साठा २३ टक्के होता.

पाण्याचे प्रमाण कमी

दक्षिण भारतातील जलाशयातील पाणीसाठा कमी होण्याचे कारण म्हणजे, या राज्यात पाण्याचे कमी होत चाललेले प्रमाण व सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा आहेत. यातून पिण्याचे पाणी व वीज निर्मिती यावर मोठा परिणाम होणार आहे.

पूर्व भारतातील परिस्थितीत सुधारणा

पूर्व भारतातील आसाम, ओदिशा व पश्चिम बंगालमध्ये जलसाठ्यात सुधारणा झालेली दिसत आहे. पूर्व भारतात २०.४३० अब्ज घनमीटर पाण्याची क्षमता असलेले २३ जलशय आहेत. त्यात ७.८८९ अब्ज घटमीटर पाणी आहे. ते त्यांच्या क्षमतेच्या ३९ टक्के आहे. गेल्यावर्षी याच भागात ३४ टक्के पाणीसाठा, तर दहा वर्षांचा सरासरी पाणीसाठा ३४ टक्के होता. याचाच अर्थ परिस्थितीत सुधारणा झाली आहे.

महाराष्ट्र, गुजरातमध्येही परिस्थिती भीषण

प. भारतातील गुजरात व महाराष्ट्रातही पाण्याचे मोठे संकट आहे. या दोन राज्यांत पाण्याचा सध्याचा साठा ११.७७१ अब्ज घनमीटर आहे. हे प्रमाण ४९ जलाशयाच्या ३१.७ टक्के आहे. गेल्यावर्षी जलाशयातील पाणीसाठा ३८ टक्के, तर दहा वर्षांच्या सरासरी पाणीसाठ्याच्या ३२.१ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in