शाह महमूद कुरेशी ५ वर्षांसाठी अपात्र ; पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांवर निवडणूक आयोगाची कारवाई

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे सहकारी शाह महमूद कुरेशी यांना तेथील निवडणूक आयोगाने ५ वर्षांसाठी निवडणुकीत भाग घेण्यास अपात्र ठरवले आहे.
शाह महमूद कुरेशी ५ वर्षांसाठी अपात्र ; पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांवर निवडणूक आयोगाची कारवाई

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे सहकारी शाह महमूद कुरेशी यांना तेथील निवडणूक आयोगाने ५ वर्षांसाठी निवडणुकीत भाग घेण्यास अपात्र ठरवले आहे. देशाची गुपिते फोडल्याप्रकरणी (सायफर केस) खान आणि कुरेशी दोघेही दोषी ठरले असून त्यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. पाकिस्तानमध्ये गुरुवारी (८ फेब्रुवारी) सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. त्यापूर्वीच हा निकाल आल्याने खान आणि कुरेशी यांचे राजकीय भवितव्य अंधारात गेले आहे.

पाकिस्तानच्या अधिकृत गुप्तता कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने सायफर प्रकरणात खान यांच्यासह कुरेशी यांना १० वर्षांचा तुरुंगवास सुनावल्यानंतर ही घोषणा झाली आहे. विशेष न्यायालयाच्या ३० जानेवारी २०२४ रोजीच्या निकालाचा दाखला देत पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, कोणतीही दोषी व्यक्ती संविधान आणि कायद्यानुसार निवडणुकीत भाग घेऊ शकत नाही. परिणामी, शाह महमूद कुरेशी पाकिस्तानी संविधानाच्या कलम ६३ (१)(एच) अंतर्गत आणि निवडणूक कायदा २०१७च्या कलम २३२ नुसार अपात्र ठरले आहेत. त्यामुळे यापुढील पाच वर्षांसाठी ते कोणतीही निवडणूक लढवू शकत नाहीत.

logo
marathi.freepressjournal.in