"पंतप्रधानांनी त्यांना..." सत्यपाल मलिकांनी पुलवामाबद्दल केलेल्या विधानावर काय म्हणाले शरद पवार?

जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामामध्ये झालेल्या सैनिकांवरील हल्ल्याबाबत धक्कादायक विधान केले होते
"पंतप्रधानांनी त्यांना..." सत्यपाल मलिकांनी पुलवामाबद्दल केलेल्या विधानावर काय म्हणाले शरद पवार?

काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी एका मुलाखतीत पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यावरून मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी केलेल्या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये ४० सैनिकांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी सत्यपाल मलिक हे जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते. भाजपनेच त्यांची नियुक्ती या पदावर केली होती. त्यानंतर आता राज्यपालपदाची मुदत संपल्यानंतर त्यांनी खरी परिस्थिती सांगितली."

शरद पवार पुढे म्हणाले की, "आपल्या सैन्याला एअरक्राफ्ट आणि आवश्यक ती साधने वेळेवर न दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना या विषयावर शांत राहायला सांगितले असल्याचेही ते म्हणाले आहेत. खरं तर ही सत्य परिस्थिती होती," असे म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला. "आपल्या सैनिकांचे रक्षण करण्याची जबाबदारी ही भाजप सरकारची आहे. पण, सरकार ही जबाबदारी घ्यायला तयार नसेल तर या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही," असे खडेबोल त्यांनी यावेळी सुनावले.

जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांनी आरोप केले होते की, "पुलवामा हल्ल्याआधी सीआरपीएफने केंद्र सरकारकडे एअरक्राफ्टची मागणी केली होती. पण त्यांनी याला नकार दिला होता. त्यानंतर मीही पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. पुलवामा हल्ला आपल्या चुकीमुळे झाला, असे मी त्यांना सांगितले. पण त्यांनी मला शांत बसण्यास सांगितले होते." असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता. यानंतर देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in