दुग्धजन्य उत्पादन आयात करू नका; शरद पवारांचे केंद्राला पत्र

कोरोना आणि त्यानंतर आलेल्या लम्पी आजारामुळे देशातील दूध उत्पादनात आधीच घट झाली आहे.
दुग्धजन्य उत्पादन आयात करू नका; शरद पवारांचे केंद्राला पत्र

केंद्र सरकारने दुग्धजन्य पदार्थांची परदेशातून आयात करण्याच्या निर्णय घेतला. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. केंद्र सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला लिहिले आहे.

कोरोना आणि त्यानंतर आलेल्या लम्पी आजारामुळे देशातील दूध उत्पादनात आधीच घट झाली असून देशात या पदार्थांची मागणी गेल्या वर्षभरात ८ ते १० टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे सरकार दुग्धजन्य उत्पादनांची आयात करण्याच्या विचारात असल्याचे बोलले जात आहे. नुकतेच दूध उत्पादक शेतकरी हे कोरोनाच्या संकटातून बाहेर पडले आहेत. दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याचा निर्णय घेतला गेला तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. डेअरी क्षेत्राचेही मोठे नुकसान होईल. त्यामुळे आपण स्वतः यामध्ये लक्ष घालावे आणि अशा प्रकारचा निर्णय घेतला जाणार नाही, याची काळजी घ्यावी, असे शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री पुरूषोत्तम रुपाला यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या लोणी व तूप आयात करण्याच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोध केला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे. शरद पवार यांच्या पत्रावर राज्याचे पशु संवर्धन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी टीका केली आहे. ‘‘लोणी व तूप आयात करण्याच्या निर्णयाचा राज्यावर काहीही परिणाम होणार नाही. हा विनाकारण दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न असून ते स्वत: संभ्रमवास्थेत आहेत,’’ असे विखे-पाटील म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in