सीतारामन-शेखर शर्मा यांच्या भेटीनंतर 'पेटीएम'चे शेअर्स तेजीत

आरबीआयने गेल्या आठवड्यात पेटीएमवर अनेक निर्बंध लादले होते. त्यामुळे त्याची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडचे शेअर्स सुमारे ४० टक्क्यांनी घसरले होते.
सीतारामन-शेखर शर्मा यांच्या भेटीनंतर 'पेटीएम'चे शेअर्स तेजीत

नवी दिल्ली : आरबीआयने गेल्या आठवड्यात पेटीएमवर अनेक निर्बंध लादले होते. त्यामुळे त्याची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडचे शेअर्स सुमारे ४० टक्क्यांनी घसरले होते. मात्र, बुधवारी कंपनीचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन याची भेट घेतली. या दहा मिनिटांच्या भेटीने पेटीएमचे शेअर्स वधारले. पेटीएमचे शेअर्स बुधवारी सुमारे १० टक्क्यांनी वाढले.

पेटीएम ब्रँडची मालकी असलेल्या वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडचे शेअर्स बुधवारी सकाळी १० टक्क्यांनी वाढले. मजबूत सुरुवातीनंतर शेअर बीएसईवर ९.९९ टक्क्यांनी वाढून ४९६.७५ रुपयांवर पोहोचला. एनएसईवर कंपनीचा शेअर ९.९९ टक्क्यांनी वाढून ४९६.२५ रुपयांवर पोहोचला. त्यामुळे कंपनीचे बाजारमूल्य ३,७२०.१७ कोटींनी वधारुन ३१,५४७.६२ कोटी रुपये झाले. वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडचा समभाग तीन दिवसांच्या तीव्र घसरणीनंतर मंगळवारी ३ टक्क्यांहून अधिक वाढला होता. तर १-५ फेब्रुवारी (तीन दिवस), कंपनीचा शेअर ४२ टक्क्यांहून अधिक घसरला आणि आरबीआयच्या निर्णयानंतर त्याच्या बाजार मूल्यात २०,४७१.२५ कोटी रुपयांची घसरण झाली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीतारामन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शर्मा यांना सांगण्यात आले की, आरबीआयच्या कारवाईमध्ये सरकारची कोणतीही भूमिका नाही आणि कंपनीने मध्यवर्ती बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे. शर्मा यांनी बुधवारी आरबीआयच्या अधिकाऱ्यांसोबतही बैठक केली आणि त्यांना आपली अडचण सांगितली. आरबीआयने मार्चपासून पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सर्व सेवांवर बंदी घातली आहे. केवळ ट्रान्सफर आणि पैसे काढण्याची परवानगी असेल परंतु वापरकर्ते २९ फेब्रुवारीपासून त्यांचे वॉलेट किंवा फास्टॅग टॉप अप करू शकणार नाहीत.

logo
marathi.freepressjournal.in