सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शर्मिष्ठा पानोलीला जामीन मंजूर

सोशल मीडियावर वादग्रस्त टिप्पण्यांसह व्हिडीओ पोस्ट केल्‍याप्रकरणी अटकेत असणारी पुण्यातील कायद्याची विद्यार्थिनी, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शर्मिष्ठा पानोली हिला कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी अंतरिम जामीन मंजूर केला. तसेच तिला पोलीस संरक्षण देण्‍यात यावे, असे आदेशही न्यायालयाने दिले.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शर्मिष्ठा पानोलीला जामीन मंजूर
Published on

कोलकाता : सोशल मीडियावर वादग्रस्त टिप्पण्यांसह व्हिडीओ पोस्ट केल्‍याप्रकरणी अटकेत असणारी पुण्यातील कायद्याची विद्यार्थिनी, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शर्मिष्ठा पानोली हिला कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी अंतरिम जामीन मंजूर केला. तसेच तिला पोलीस संरक्षण देण्‍यात यावे, असे आदेशही न्यायालयाने दिले.

उच्‍च न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले की, याचिकाकर्त्याला तपासात सहकार्य करावे लागेल. तिला देश सोडून जाता येणार नाही. याचिकाकर्त्याला योग्य पोलीस संरक्षण देण्यात यावे, असे स्‍पष्‍ट करत उच्‍च न्‍यायालयाने तिला १०,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला.

शर्मिष्ठाच्या वकिलांनी सांगितले की, या प्रकरणी शर्मिष्‍ठाला झालेली अटक बेकायदेशीर आहे. एफआयआरमध्ये नमूद केलेले सर्व गुन्हे अदखलपात्र आहेत. अटकेपूर्वी तिला कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती. नवीन कायद्यानुसार सूचना करणे अनिवार्य आहे. पानोलीच्या कुटुंबानेही पोलिसांकडे तक्रार केली होती की, तिच्‍या जीवाला धोका आहे. ७ मेच्या रात्री पोस्ट केल्यानंतर ८ मे रोजी सोशल मीडियावरून कथित आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकण्यात आली आहे.

शर्मिष्ठाने ऑपरेशन सिंदूर संबंधित व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. यामध्‍ये एका विशिष्ट धर्माला लक्ष्य करून अपमानजनक टिप्पणी केली होती. काही वेळाने तिने हा व्‍हिडीओ हटवला. मात्र ही क्लिप व्हायरल झाली. याप्रकरणी कोलकातामधील पोलीस ठाण्‍यात शर्मिष्‍ठाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. कोलकाता पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला. शर्मिष्‍ठाने व्‍हिडीओ हटविला असला तरी पानोलीने अपमानजनक टिप्पणी केली होती.

logo
marathi.freepressjournal.in