
थिरुवनंतपुरम : प्रियकराला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष मिसळून त्याची हत्या करणाऱ्या प्रेयसीला दोषी ठरवून न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. थिरुवनंतपुरम जिल्हा न्यायालयाने सोमवारी हा निकाल दिला. या तरुणीचा विवाह दुसरीकडे ठरला होता. तिने प्रियकराचा त्रास कायमचा सोडवण्यासाठी त्याचा बळी घेतला. ऑक्टोबर २०२२ मध्ये तिने आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष मिसळवून आपल्या प्रियकराला पाजले. या दोषी मुलीचे काका निर्मला कुमारण नायर यांना या हत्येमध्ये मदत केल्याप्रकरणी व पुरावे नष्ट केल्याप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तर तरुणीच्या आईला पुराव्याअभावी निर्दोष सोडले आहे. दोषी ग्रीष्माच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, ती शिकलेली असून तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे.
तिच्या नावाने कोणताही गुन्हा नाही. त्यामुळे तिची शिक्षा कमी करावी. न्यायालयाने सांगितले की, या गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता दोषीचे वय व अन्य परिस्थिती लक्षात घेणे गरजेचे नाही. ग्रीष्माने कट करून प्रियकर शेरोन याची हत्या केली. तसेच अटकेनंतर तिने आपला जीव देण्याचा प्रयत्न केला. कारण तिला तपासात अडथळे आणायचे होते.