असहमती केवळ ऑपरेशन सिंदूरबाबत - शशी थरूर

संसदेत मी कधीही काँग्रेस पक्षाच्या अधिकृत भूमिकेचे उल्लंघन केलेले नाही. सैद्धांतिकदृष्ट्या माझी एकमेव सार्वजनिक असहमती ही केवळ 'ऑपरेशन सिंदूर'बाबत होती आणि त्या भूमिकेबद्दल मला कोणताही पश्चात्ताप नाही, असे स्पष्ट प्रतिपादन काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

तिरुवनंतपुरम : संसदेत मी कधीही काँग्रेस पक्षाच्या अधिकृत भूमिकेचे उल्लंघन केलेले नाही. सैद्धांतिकदृष्ट्या माझी एकमेव सार्वजनिक असहमती ही केवळ 'ऑपरेशन सिंदूर'बाबत होती आणि त्या भूमिकेबद्दल मला कोणताही पश्चात्ताप नाही, असे स्पष्ट प्रतिपादन काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केले. 'केरळ लिटररी फेस्टिव्हल'मध्ये आयोजित एका सत्रात ते बोलत होते. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत भाष्य करताना थरूर म्हणाले की, एक निरीक्षक आणि लेखक म्हणून मी त्यावेळी एका वृत्तपत्रात लेख लिहिला होता. अशा घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, तर भारताने याला जशास तसे आणि कडक प्रत्युत्तर दिले पाहिजे, असे माझे मत होते.

मतभेदांच्या चर्चेला पूर्णविराम

शशी थरूर आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठींमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. कोची येथील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी थरूर यांना पुरेसे महत्त्व दिले नसल्याचे बोलले जात होते, तसेच राज्यातील स्थानिक नेत्यांकडूनही त्यांना वारंवार डावलण्याचे प्रयत्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर थरूर यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याचे मानले जात आहे.

सरकारच्या निर्णयाचे आश्चर्य

भारताचे मुख्य लक्ष हे विकासावर असायला हवे. आपण पाकिस्तानसोबतच्या दीर्घकालीन संघर्षात अडकता कामा नये. लष्करी कारवाई करायचीच असेल, तर ती केवळ दहशतवादी तळांपुरती मर्यादित असावी, असे थरूर यांनी नमूद केले. विशेष म्हणजे, भारत सरकारने पुढे जाऊन अशाच पद्धतीची पावले उचलली, याचे आपल्याला आश्चर्य वाटल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

... तरच आपण जगू

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ऐतिहासिक विधानाचा संदर्भ देत थरूर म्हणाले की, जर भारतच उरला नाही, तर कोण जिवंत राहणार, जेव्हा भारताची प्रतिष्ठा, सुरक्षा आणि जागतिक स्तरावरील स्थानाचा प्रश्न येतो, तेव्हा देशालाच प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. प्रगत भारत घडवण्याच्या प्रक्रियेत राजकीय पक्षांमध्ये मतभेद असू शकतात, परंतु राष्ट्रीय हिताच्या बाबतीत देश सर्वतोपरी असला पाहिजे.

logo
marathi.freepressjournal.in