बांगलादेशात पुन्हा शेख हसीनाच; भारताशी मैत्री कायम ठेवण्याची ग्वाही

निवडणुकीत पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग या पक्षाने संसदेतील एकूण ३०० पैकी २२३ जागा जिंकल्या.
बांगलादेशात पुन्हा शेख हसीनाच; भारताशी मैत्री कायम ठेवण्याची ग्वाही
Published on

ढाका : बांगलादेशात नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विद्यमान पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग या पक्षाला पुन्हा बहुमत मिळाले आहे. त्यामुळे शेख हसीना सलग चौथ्या वेळी पंतप्रधान बनल्या आहेत. फेरनिवडीनंतर शेख हसीना यांनी भारताशी मैत्री कायम ठेवण्याची ग्वाही दिली आहे.

माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) या प्रमुख विरोधी पक्षाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता आणि निवडणुकीच्या दिवशी संप पाळला. त्यांनी सांगितले की, पक्षाने मंगळवारपासून शांततापूर्ण सार्वजनिक सहभागाच्या कार्यक्रमाद्वारे सरकारविरोधी आंदोलन तीव्र करण्याची योजना आखली आहे. सरकारने घेतलेले मतदान बोगस असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. निवडणुकीच्या आधीपासून आणि मतदानाच्या दिवशीही देशात हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या.

निवडणुकीत पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग या पक्षाने संसदेतील एकूण ३०० पैकी २२३ जागा जिंकल्या. संसदेतील प्रमुख विरोधी पक्ष जातीय पार्टीला ११ जागा मिळाल्या. बांगलादेश कल्याण पक्षाने एका मतदारसंघात विजय मिळवला तर ६२ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले. जातीय समाजतांत्रिक दल आणि वर्कर्स पार्टी ऑफ बांगलादेशने प्रत्येकी एक जागा जिंकली. स्वत: शेख हसीना यांनी गोपालगंज-३ मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला. त्या आठव्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in