कॉँग्रेस सोडून शेट्टर पुन्हा भाजपमध्ये!

स्वगृही परतल्यानंतर शेट्टर म्हणाले की, भाजपने पूर्वी मला खूप जबाबदाऱ्या दिल्या होत्या
कॉँग्रेस सोडून शेट्टर पुन्हा भाजपमध्ये!

बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर भाजप पक्ष सोडल्यापासून अवघ्या सात महिन्यांनंतर स्वगृही परतले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते बी. एस. येडीयुरप्पा यांच्या उपस्थितीत तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या समक्ष नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात शेट्टर यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या एप्रिल महिन्यातच शेट्टर भाजप सोडून काँग्रेस पक्षात गेले होते.

स्वगृही परतल्यानंतर शेट्टर म्हणाले की, भाजपने पूर्वी मला खूप जबाबदाऱ्या दिल्या होत्या. पण काही मुद्यांवरून मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मागील ८ ते ९ महिन्यांत अनेक चर्चा झाल्या, तसेच भाजप कार्यकर्त्यांनी पुन्हा भाजपमध्ये येण्याची गळ घातली. येडीयुरप्पाजी आणि विजयेंद्रजी यांची देखील मी भाजपमध्ये परतावे अशीच इच्छा होती. तेव्हा मी आता पुन्हा भाजप पक्षात प्रवेश करीत आहे. नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान होतील असा मला पूर्ण विश्वास आहे, असे शेट्टर यांनी पक्ष प्रवेशानंतर सांगितले. शेट्टर यांनी आपला राजकीय प्रवास १९८० पासून सुरू केला होता. तेव्हापासून भाजपमध्ये त्यांनी अनेक पदांवर काम केले. कर्नाटक प्रदेशाध्यक्ष आणि कर्नाटक विधानसभा विरोधी पक्षनेते या पदांवर त्यांनी काम केले. नंतर त्यांनी कर्नाटक विधानसभा अध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले. जुलै २०१२ ते मे २०१३ पर्यंत ते कर्नाटक मुख्यमंत्री पदावर होते. ते एकूण सहा वेळा आमदार होते. २०२३ साली विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. आता मात्र ते पुन्हा स्वगृही दाखल झाले आहेत.

विश्वासघात केला - काँग्रेसची प्रतिक्रिया

काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी मात्र शेट्टर यांनी विश्वासघात केल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी देखील, काँग्रेसमध्ये त्यांना मानसन्मानाने वागवण्यात आले होते. त्यांच्या पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in