पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा अधिकार कोर्टाला नाही; शिवसेनेचा युक्तिवाद

सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल लवकरच लागणार असून आज ठाकरे गटानंतर शिवसेनेनेदेखील युक्तिवादाला सुरुवात केली
पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा अधिकार कोर्टाला नाही; शिवसेनेचा युक्तिवाद

गेल्या ८ महिन्यांपासून सुरु असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता लवकरच संपणार असल्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले की, याच आठवड्यामध्ये हे प्रकरण संपवायचे आहे. त्यामुळे शिंदे गटाने परवापर्यंत आपला युक्तिवाद पूर्ण करावा, असे निर्देश दिले आहेत. त्यानंतर आज पहिले ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर शिवसेनेचे (शिंदे गट) वकील नीरज कौल यांनी केला.

वकील नीरज कौल यावेळी म्हणाले की, "विधिमंडळात आमदारांनी बहुमताने घेतलेले निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द करू नये. नबाम रेबिया प्रकरणात आमदारांच्या जीवाला धोका होता. तसे, या सत्तासंघर्षाच्या प्रकरणामध्ये नाही. त्यामुळे या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करू नये. तसेच, आमदारांनी पक्षाचे समर्थन काढले म्हणूनच राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश दिले होते. उद्धव ठाकरेंवर विश्वास नाही, असे आमदार म्हणाले होते. त्यानंतर बहुमत चाचणी घेणे, हे राज्यपालांचे कर्तव्य आहे." अशी बाजू त्यांनी मांडली.

पुढे ते म्हणाले की, "पक्ष कोणाचा? हे ठरवण्याचे अधिकार न्यायालयाला नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला धरुनच पुढील निर्णय घ्यावेत." अशी मागणी त्यांनी केली. यावर न्यायालयाने म्हणले की, तुम्ही शिवसेना आहे की नाही, हे बहुमत चाचणी ठरवू शकत नाही. ३० जूनला निवडणूक आयोगाचा निर्णय झाला नव्हता. ३० जूनला शिवसेना हा एकच पक्ष होता." यावर वकील नीरज कौल म्हणाले की, "३४ आमदार, ७ अपक्षांनी ठाकरेंवर अविश्वास दाखवला. आम्हीच शिवसेना आहोत, हे बहुमत चाचणीतून सिद्ध झाले आहे."

logo
marathi.freepressjournal.in