केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मदतीला शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी धावल्या

भाजपला लक्ष्य करत असताना प्रियांका चतुर्वेदी मात्र स्मृती इराणी यांच्या पाठीशी उभ्या राहिल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मदतीला शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी धावल्या

भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कन्येच्या गोव्याच्या बारवरून त्यांना काँग्रेसकडून लक्ष्य केले जात असताना शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी त्यांच्या मदतीला धावल्या आहेत. एकीकडे शिवसेना फोडल्यावरून संजय राऊतांसारखे नेते भाजपला लक्ष्य करत असताना प्रियांका चतुर्वेदी मात्र स्मृती इराणी यांच्या पाठीशी उभ्या राहिल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची कन्या झोईश इराणी ही गोव्यात एका बनावट लायसन्सवर सिली सोल्स अॅण्ड बार या नावाने बार रेस्टॉरंट चालवत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने शनिवारी केला. त्यावरून बराच गदारोळ माजला आहे. काँग्रेसचे प्रवक्ता पवन खेडा, सरचिटणीस जयराम रमेश व गोव्याचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिल्ली व पणजी येथे स्वतंत्र पत्रकार परिषदांमध्ये इराणी यांच्यावर हा आरोप केला. अर्थात, इराणी यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.माझी कन्या महाविद्यालयात शिकत असून ती कोणताही बार चालवत नसल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

एकीकडे काँग्रेस यावरून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असताना शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी या स्मृती इराणींच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्या आहेत.

शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करत भाजपने महाराष्ट्रात सत्तापालट केले आहे. शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, याला पूर्णपणे भाजप जबाबदार असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत तसेच इतर नेते भाजपवर तुटून पडत आहे. अशा परिस्थितीत शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचे भाजप मंत्र्याच्या मागे उभे राहणे सर्वांचं आश्चर्यात टाकणारे आहे.

काय आहे चतुर्वेदींचं टि्वट?

प्रियांका चतुर्वेदी म्हणतात, ‘‘एका अठरा वर्षांच्या मुलीला खलनायक ठरवून तिला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. एका अठरा वर्षांच्या मुलीला हॉटेल सुरु करण्यासाठी परवाना लागतो, हे पण माहीत नसते.’’ प्रियांका चतुर्वेदी पुढे म्हणतात, ‘‘आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी एखाद्या मुलीने असे केले असेल तर त्यात चूक काय आहे. एखाद्या मुलीला असे बदनाम करणे चुकीचे आहे. मी एका १९ वर्षांच्या मुलीची आई असल्याने हा विषय समजू शकते. माझ्या भूमिकेचा राजकारणाशी संबंध नाही.’’

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in