Shiv Sena Symbol Dispute: ...तर पक्षचिन्ह गोठवा; कपिल सिब्बल यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी

शिवसेना पक्ष आणि चिन्ह या बाबतच्या याचिकेवरील निर्णयाची सर्वांना उत्सुकता असतानाच बुधवारी शिवसेनेच्या (उबाठा) वतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी पहिल्यांदाच शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे.
Shiv Sena Symbol Dispute: ...तर पक्षचिन्ह गोठवा; कपिल सिब्बल यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी
Shiv Sena Symbol Dispute: ...तर पक्षचिन्ह गोठवा; कपिल सिब्बल यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि चिन्ह या बाबतच्या याचिकेवरील निर्णयाची सर्वांना उत्सुकता असतानाच बुधवारी शिवसेनेच्या (उबाठा) वतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी पहिल्यांदाच शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे, राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या असून न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बाबतची पुढील सुनावणी गुरुवारी पुन्हा होणार आहे.

जर ते चिन्ह शिंदे गटाला मिळू शकत नसेल आणि मलाही मिळू शकत नसेल, तर ते चिन्ह गोठवले गेले पाहिजे. कारण, पक्षाच्या नावावर माझा हक्क आहे, अशा शब्दात कपिल सिब्बल यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत पहिल्यांदाच मोठी मागणी केली आहे.

आत्तापर्यंत शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरेंनाच दिले पाहिजे, अशी मागणी सिब्बल न्यायालयात करत होते. मात्र, पहिल्यांदाच कपिल सिब्बल यांनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे या सर्वांनी काम केलं, मात्र त्यावेळी कुणीही आक्षेप घेतला नाही. जर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना फुटीच्या आधी पक्षाच्या संविधानावर कोणताही आक्षेप नव्हता, तर मग निवडणूक आयोगाने ती घटना कशी अयोग्य ठरवली, असा सवाल उपस्थित करून सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला.

सिब्बल यांनी यापूर्वीही आपले मुद्दे खंडपीठासमोर मांडताना विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगवेगळा असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला होता. त्यामुळे, शिवसेना पक्ष आणि चिन्ह आपल्यालाच मिळेल, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांनी अनेकदा व्यक्त केला आहे. तर, एकतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळेल किंवा ते गोठवले जाईल, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले होते. आता, ठाकरेंचे वकिल कपिल सिब्बल यांनी मोठी मागणी करत चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे.

फडणवीसांची भूमिका काय?

विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर बोट ठेवतानाच देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना बहुमत चाचणी घेण्यास सांगितली असा मोठा दावा सिब्बल यांनी सुनावणीदरम्यान मांडला. विश्वासदर्शक ठरावावरही त्यांनी मोठे भाष्य केले. विश्वासदर्शक ठरावावर भाजपसह बंडखोरांनी मतदान केल्याचे ते म्हणाले. विधीमंडळ पक्षाने एकनाथ शिंदे यांना मुख्य नेता निवडले, वास्तविक हा अधिकार राजकीय पक्षाचा असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. या सुनावणीत पहिल्यांदाच भाजपकडे बोट करण्यात आले आहे.

मी न्यायालयाला विनंती करतो की, 'शिवसेना' हे नाव ठाकरे यांचेच आहे आणि शिंदे गटाला ते चिन्ह मिळू शकत नाही, असा निर्णय द्यावा. त्यांनी त्या चिन्हाचा लाभ घेतला आहे, याचा अर्थ त्यांच्या बाजूने कोणताही न्याय्य हक्क निर्माण होत नाही. हा चिन्हाचा अनधिकृत वापर करण्याचा प्रकार आहे.

कपिल सिब्बल

शिंदेंना अपात्र ठरवता येईल का?

न्या. बागची यांनी कामत यांना प्रश्न विचारला की, अध्यक्षांचा निर्णय कायद्याच्या विरोधात असेल, तर आम्ही तो आदेश रद्द करू शकतो. परंतु आम्ही स्वतः शिंदे यांना अपात्र घोषित करू शकतो का. यावर ज्येष्ठ वकील देवदत्त कामत म्हणाले की, ज्या निकालांमध्ये अपात्रता योग्य ठरवली गेली आहे, तेथे सर्वोच्च न्यायालयाने स्वतः अपात्र घोषित केले आहे असे म्हणत एकनाथ शिंदे यांना अपात्र घोषित करण्याची मागणी केली.

३९ जणांची एकसारखीच चूक

विधानसभा अध्यक्षांसमोर शिंदे गटाच्या ३९ आमदारांनी सुरुवातीला २०१८ ची पक्षघटना जोडली होती, पण नंतर प्रतिज्ञापत्रात 'ती वकिलांची चूक होती' असा दावा केला. यावर सिब्बल म्हणाले, ३९ स्वतंत्र उत्तरांमध्ये ३९ वेगवेगळ्या वकिलांकडून एकसारखीच चूक कशी होऊ शकते, सर्वांनी मिळून एकाच वेळी अशी चूक करणे, हा एक सुनियोजित कट असू शकतो, असेही ते म्हणाले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in