
तामिळनाडुतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आपल्या विवाहित प्रेयसीला 'सीक्रेटली' भेटायला गेलेल्या युवकाने प्रेयसीच्या तीन वर्षाच्या मुलाचे डोके भींतीवर आपटले. ही घटना बुधवारी (22 जानेवारी) घडली. घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान शुक्रवारी (24, जानेवारी) मृत्यू झाला. घडलेली घटना लपवण्यासाठी मूल बाईकवरून खाली पडल्यामुळे जखमी झाल्याचा बनाव सुरुवातीला करण्यात आला. मात्र, नंतरच्या तपासात खरी घटना उघडकीस आली. याप्रकरणी अन्नाथनपट्टी पोलिसांनी शनिवारी (25 जानेवारी) आरोपी प्रियकराला अटक केली. तर मुलाची आई षण्मुगप्रिया ही फरार आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, अटक आरोपी तमिलारासन (22) हा किचिपलायम येथील रोजंदरी कामगार आहे. तमिलारासनचे षण्मुगप्रिया (23) नावाच्या विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. षण्मुगप्रिया हिचा जी पसुपती (28) याच्यासोबत विवाह झाला होता.
तमिलारासन हा बुधवारी षण्मुगप्रियाला भेटण्यासाठी गेला होता. या भेटीदरम्यान षण्मुगप्रियाचा तीन वर्षाचा मुलगा सातत्याने रडत होता. त्याचा तमिलारासनने मुलाचे डोके भिंतीवर आपडले. भिंतीवर डोके आपटल्याने मुलाला डोक्यात जबर मार लागला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला बुधवारी रात्रीच सालेम सरकारी मोहन कुमारमंगलम मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यावेळी मुलगा दुचाकीवरून पडल्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याचे डॉक्टरांना सांगितले. मात्र, तपासणीदरम्यान डॉक्टरांना असे आढळून आले की मुलाच्या डोक्यावरील जखमा दुचाकी अपघाताशी जुळत नाहीत. त्यांनी याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांना दिली.
पोलिसांनी घटनेची चौकशी केली असता समजले की आरोपी तमिलारासननेच त्या मुलाच्या डोक्याला दुखापत केली. दरम्यान, उपचारादरम्यान या मुलाचा शुक्रवारी मृत्यू झाला. पोलिसांनी तमिलारासनवर खुनाचा गुन्हा दाखल करून शनिवारी सकाळी त्याला अटक केली. तर मुलाची आई षण्मुगप्रिया सध्या फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.