सहारणपूर : उत्तर प्रदेशात सुनेने हुंडा दिला नाही म्हणून तिला एचआयव्हीचे इंजेक्शन टोचण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी सहारणपूर येथील न्यायालयाने संबंधित महिलेच्या सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने उत्तर प्रदेश पोलिसांना दिले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सहारणपूरचे पोलीस अधीक्षक (ग्रामीण) सागर जैन म्हणाले की, पीडिता सहारणपूर येथे राहणारी आहे. तिचा पती, दीर, नणंद, सासू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, माझ्या मुलीचे लग्न फेब्रुवारी २०२३ रोजी झाले. लग्नात ४५ लाख रुपये खर्च केले. मी जावयाला एक एसयूव्ही, १५ लाख रुपये रोख दिले. तरीही सासऱ्याच्या लोकांनी आणखी १० लाख रुपये रोख व मोठ्या एसयूव्हीची मागणी केली. त्यामुळे माझ्या मुलीला ते त्रास देऊ लागले. २५ मार्च २०२३ रोजी माझ्या मुलीने सासरचे घर सोडले. त्यानंतर पंचायतीने माझ्या मुलीला पुन्हा सासरी पाठवले. हुंडा देत नाही म्हटल्यावर माझ्या मुलीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले.