पुन्हा एकदा भर न्यायालयात बूटहल्ला

१९९७ साली झालेल्या एका मारहाणीच्या प्रकरणातील तक्रारदार व्यक्तीने अतिरिक्त प्रधान न्यायाधीश एम. पी. पुरोहित यांच्या दिशेने आपले दोन्ही बूट फेकले. या प्रकरणात चार आरोपींवर हल्ल्याचे आरोप होते. मात्र...
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नागपूर : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा भर न्यायालयात बूट फेकण्याची घटना घडली आहे. ही घटना भद्रा न्यायालयात दुपारच्या सुमारास घडली. १९९७ साली झालेल्या एका मारहाणीच्या प्रकरणातील तक्रारदार व्यक्तीने अतिरिक्त प्रधान न्यायाधीश एम. पी. पुरोहित यांच्या दिशेने आपले दोन्ही बूट फेकले. या प्रकरणात चार आरोपींवर हल्ल्याचे आरोप होते. मात्र, न्यायालयाने त्यांना निर्दोष घोषित केले. हा निर्णय ऐकताच तक्रारदार आक्रमक झाला आणि न्यायालयातच बूट फेकण्याचा प्रकार घडला.

सरकारी वकिलांच्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने निर्णयानंतर गोंधळ घालण्यास सुरुवात केली, न्यायाधीशांना शिवीगाळ केली आणि पोलीस तसेच वकिलांनी शांत करण्याचा प्रयत्न केल्यावर तो आणखी भडकला. त्याने सलग दोन बूट न्यायाधीशांच्या दिशेने फेकले.

सुदैवाने या घटनेत न्यायाधीशांना कोणतीही दुखापत झाली नाही. न्या. पुरोहित यांनी त्या व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदवण्यास नकार दिला. करंज पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले असता, न्यायाधीशांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई न करण्याची विनंती केली.

सुरक्षेची मागणी

या घटनेनंतर गुजरात न्यायिक सेवा संघाने तत्काळ न्यायालयीन सुरक्षेच्या बळकटीकरणाची मागणी केली आहे. संघाचे अध्यक्ष एस. जी. डोडिया यांच्या नेतृत्वाखाली प्रसिद्ध केलेल्या निवेदनात न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी आणि न्यायालयीन इमारतींच्या सुरक्षेसाठी तत्काळ आणि कठोर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच आरोपींची त्वरेने ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. संघाने या घटनेचा तसेच काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचाही तीव्र शब्दांत निषेध केला आहे आणि न्यायव्यवस्थेवरील अशा प्रकारच्या हल्ल्यांविरुद्ध ठाम भूमिका घेतली आहे.

logo
marathi.freepressjournal.in