शोपियानमधून दोन दहशतवाद्यांना अटक; एके-५६ सह दारुगोळा जप्त

पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी आता काश्मीर खोऱ्यातील शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे. या दरम्यान सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळत आहे. बुधवारी रात्री एका शोधमोहिमेदरम्यान सुरक्षा दलाने शोपियानमधून दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे.
शोपियानमधून दोन दहशतवाद्यांना अटक; एके-५६ सह दारुगोळा जप्त
Published on

श्रीनगर : पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी आता काश्मीर खोऱ्यातील शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे. या दरम्यान सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळत आहे. बुधवारी रात्री एका शोधमोहिमेदरम्यान सुरक्षा दलाने शोपियानमधून दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या संघटनेशी संबंधित असून इरफान बशीर आणि उजैर सलाम अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून प्रचंड दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी बुधवारी रात्री शोपियानच्या बस्कुचन भागात शोधमोहीम हाती घेतली होती. या ठिकाणी दहशतवादी लपून बसल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता. यानंतर त्यांनी एक रणनीती आखून या परिसराला चारही बाजूंनी वेढा दिला आणि पोलिसांची कुमक पाहून दोन्ही दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले.

अटक करण्यात आलेल्या या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. दोघांकडे दोन एके-५६, ४ मॅगजिन, १०२ राऊंड गोळ्या, २ हँड ग्रेनेड आणि २ पाऊच इतका मोठा साठा सापडला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे आणि योग्य कारवाईमुळे चकमक टळली आणि दोन्ही हायब्रिड दहशतवाद्यांना जिवंत ताब्यात घेता आले. पोलिसांनी या दोन्ही दहशतवाद्यांविरोधात एफआयआर दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.

सीमेपलिकडून भारतात दहशतवादी घुसवण्याचे प्रयत्न पाकिस्तान नेहमीच करत असते. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिले जाते.

हायब्रिड दहशतवादी कोण आहेत?

हायब्रिड दहशतवादी म्हणजे असे लोक ज्यांची नावे कोणत्याही दहशतवादी वॉन्टेड यादीत नसतात. मात्र, हे लोक इतके कट्टरपंथी असतात की, कोणत्याही वेळी दहशतवादी कारवाया करून पुन्हा आपल्या सामान्य जीवनाची सुरुवात करतात. अशा दहशतवाद्यांना ओळखणे कठीण असते.

logo
marathi.freepressjournal.in