दुबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत असून ‘ओपेक’ देशांकडून उत्पादन घटवले जात आहे. जागतिक आर्थिक संकट, मंदीमुळे कच्च्या तेलाचा जास्त वापर करणाऱ्या भारतासारख्या देशांबाबत संवेदनशीलता दाखवा, असे आवाहन भारताचे तेल मंत्री हरदीप पुरी यांनी ‘ओपेक’ संघटनेला केले आहे.
अबुधाबीत ‘ओपेक’ची व तेल कंपन्यांची बैठक येथे भरली आहे. यावेळी तेल मंत्री हरदीप पुरी यांनी ‘ओपेक’चे सरचिटणीस हॅथम अल घैस यांची भेट घेतली. तेल मंत्री हरदीप पुरी म्हणाले की, आम्ही ‘ओपेक’चे सरचिटणीस हॅथम अल घैस यांच्याशी जागतिक ऊर्जेबाबत चर्चा केली. भारत १०१ अब्ज डॉलर्स खर्च करून ६० टक्के कच्चे तेल आयात करतो. सामाजिक उत्थानासाठी किफायतशीर दरात ऊर्जा मिळाली पाहिजे. तेलाचे उत्पादन किती करावे व निर्यात किती करावे हा तेल उत्पादक देशांचा अधिकार आहे. मात्र, त्याचे परिणाम पाहणे गरजेचे आहे.
तेल उत्पादक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन घटवण्याची घोषणा केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात वाढ झाली. तेलाच्या पिंपाचा दर ९७ डॉलर्सवर पोहोचला होता. सध्या तो ९० डॉलर्सवर आहे.