विशेष अधिवेशनाने नव्या संसद भवनाचा 'श्रीगणेशा'

अधिवेशन संसदेच्या जुन्या इमारतीत भरवण्यात आले होते
विशेष अधिवेशनाने नव्या संसद भवनाचा 'श्रीगणेशा'

नवी दिल्ली: केंद्र सरकारने उभारलेल्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन १९ सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थीच्या शुभ मुहुर्तावर करण्यात येणार आहे. संसदेचे विशेष अधिवेशन १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान बोलावण्यात आले आहे. ते १८ सप्टेंबर रोजी जुन्या संसद भवनात भरेल, पण १९ सप्टेंबर पासून ते नव्या संसद भवनात भरुवून त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी हे विशेष अधिवेशन अमृतकालला आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केले असल्याचे 'एक्स' केले आहे. सध्या १७ वी लोकसभा सुरु असून या लोकसभेचे विशेष सत्र हे १३ वे सत्र आहे. ते १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान सुरु राहील. अमृतकाळामधील या सत्रात सकारात्मक चर्चा होईल, अशी अपेक्षा जोशी यांनी आपल्या एक्सवरील विधानात व्यक्त केली आहे. येत्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात देशातील काही राज्यात विधानसभा निवडणुका तर त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावल्यामुळे राजकीय वर्तुळात आर्श्चय व्यक्त केले जात आहे. सरकार मात्र या अधिवेशनात सकारात्मक चर्चा घडून येईल, अशी अपेक्षा करीत आहे.

विविध मुद्यांवर चर्चेची सोनिया गांधी यांची मागणी !

कॉंग्रेस संसदीय पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या सत्रात विविध मुद्यांवर चर्चा करण्याची मागणी केली आहे. त्यात देशाची वर्तमान आर्थिक परिस्थिती यासह अनेक मुद्यांचा समावेश आहे. आपल्या पत्रात सोनिया म्हणतात की, विरोधकांना नक्कीच या अधिवेशनात सहभागी व्हायचे आहे कारण त्यात जनतेसंबधित महत्वाच्या आणि जनकल्याणाच्या मुद्यांवर चर्चा करण्याची संधी मिळेल. पत्रात पुढे मात्र सोनियांनी या सत्राची घोषणा करतांना सरकारने विरोधकांना विश्वासात न घेतल्याची तक्रार केली आहे. विरोधी पक्षांपैकी एकालाही या विशेष सत्राची साधी कल्पना देखील देण्यात आली नाही असे त्यांनी म्हटले आहे. ऑगस्ट महिन्यात संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता झाली. हे अधिवेशन संसदेच्या जुन्या इमारतीत भरवण्यात आले होते.

logo
marathi.freepressjournal.in