श्रीकांत शिंदेंनी लोकसभेत वाचली हनुमान चालिसा

आज पुन्हा एकदा विरोधकांनी अविश्वास ठराव मांडला आहे
श्रीकांत शिंदेंनी लोकसभेत वाचली हनुमान चालिसा

नवी दिल्ली : शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी लोकसभेत चक्क हनुमान चालिसा वाचली आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेवर बाळासाहेब ठाकरेंची हिंदुत्व सोडल्याची टीका केली. त्यानंतर त्यांनी आपल्या पक्षातर्फे अविश्वास ठरावाला विरोध जाहीर केला.

इंडिया आघाडीवर टीका करताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, त्यांनी यूपीए ही आघाडी भ्रष्टाचारयुक्त झाल्यामुळे आघाडीचे नाव बदलून इंडिया केले. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये राज्यात लोकांना हनुमान चालिसा वाचन करण्यापासून रोखण्यात आले होते. मला पूर्ण हनुमान चालिसा मुखोद्गत आहे. असे म्हणून त्यांनी हनुमान चालिसा म्हणण्यास सुरुवात केली. मात्र लोकसभा अध्यक्षांनी त्यांना थांबवून भाषण पुढे सुरू करण्यास सांगितले. शिंदे पुढे म्हणाले की, २०१८ साली देखील विरोधकांनी एनडीए आघाडीविरोधात अविश्वास ठराव मांडला होता, पण त्यानंतर एनडीए आघाडी बहुमत मिळवून सत्तेत आली. आज पुन्हा एकदा विरोधकांनी अविश्वास ठराव मांडला आहे. यावेळी एनडीए आघाडी ४०० चा आकडा पार करेल, असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. इंडिया आघाडीबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, ते सगळे एका व्यक्तीच्या विरोधात एक झाले आहेत. त्यांच्याकडे ना नेता ना धोरण. प्रत्येक नेत्याला पंतप्रधान व्हायचे आहे. कारण या संघाला कर्णधारच मिळालेला नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in