
फ्लोरिडा : भारतीय वायूदलातील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी बुधवारी दुपारी १२ वाजून एक मिनिटाने नासाच्या (अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था) फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून ‘ॲक्सिऑम-४’ या अंतराळ मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले. नासाचे ‘फॉल्कन-९’ हे यान घेऊन ते अवकाशात झेपावले. त्यांच्याबरोबर या मोहिमेत आणखी तीन अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे रवाना झाले आहेत.
ग्रुप कॅप्टन आणि ‘इस्रो’चे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी बुधवारी यशस्वीरित्या अवकाशात झेप घेत इतिहास रचला आहे. तब्बल ४१ वर्षांपूर्वी राकेश शर्मा यांनी केलेल्या ऐतिहासिक अंतराळ प्रवासानंतर, अंतराळात जाणारे ते दुसरे भारतीय ठरले आहेत. अनेक तांत्रिक अडचणींवर मात करत, भारतीय वेळेनुसार आज दुपारी १२ वाजून १ मिनिटांनी ‘अॅक्सिओम मिशन ४’अंतर्गत (अॅक्स-४) स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटने ड्रॅगन अंतराळयानासह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (आयएसएस) उड्डाण केले.
‘ॲक्सिऑम-४’ मोहिमेअंतर्गत अन्य तीन अंतराळवीरांबरोबर शुभांशू शुक्ला यांनी बुधवारी अवकाशात उड्डाण केले. यापूर्वी ३ एप्रिल १९८४ रोजी भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा हे सोव्हिएत संघाच्या मदतीने अवकाश मोहिमेवर गेले होते. तब्बल ४१ वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय अंतराळवीर आज अवकाशात झेपावला आहे. शुभांशू शुक्ला हे मूळचे लखनऊचे रहिवासी असून १ वर्षाचे प्रशिक्षण व कठोर मेहनतीनंतर त्यांची ‘नासा’ने या मोहिमेसाठी निवड केली आहे.
गुरुवारी ४ वाजता अंतराळ स्थानकावर
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील ही चौथी खासगी अंतराळवीर मोहीम आहे. अंतराळवीर एका नवीन स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानातून स्थानकाकडे प्रवास करत आहेत. गुरुवारी, २६ जून रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी ४ वाजता ते पोहचतील. त्यानंतर अंतराळवीर १४ दिवसांपर्यंत प्रयोगशाळेत राहणार आहेत. नासाच्या माजी अंतराळवीर आणि ‘ॲक्झिओम स्पेस’च्या मानवी अंतराळ उड्डाण संचालक पेगी व्हिटसन या मोहिमेच्या कमांडर आहेत, तर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अंतराळवीर शुक्ला पायलट म्हणून कार्यरत आहेत. या मोहिमेतील दोन विशेषज्ञ पोलंडचे ‘युरोपियन स्पेस एजन्सी’चे प्रकल्प अंतराळवीर स्लावोस्झ उझनान्स्की-विस्निव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू आहेत.
पत्नीसाठी खास शब्द
आयुष्याच्या प्रवासातील माझी अद्भूत भागीदार असलेल्या कामना शुक्लाचे विशेष आभार. तुझ्याशिवाय हे काहीच शक्य नव्हते आणि तू नसतीस तर या कशालाच किंमत नसती. आमच्यापैकी कोणीही एकट्याने अंतराळात प्रवास करत नाहीय. अनेकांच्या भरवशावर आम्ही हे करू शकतो. मी तुमच्या प्रत्येकाचा आभारी आहे. धन्यवाद.
१४ दिवसांची वैज्ञानिक मोहीम
शुक्ला आणि त्यांचे सहकारी १४ दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहणार आहेत. या काळात ते अनेक महत्त्वपूर्ण वैज्ञानिक प्रयोगांमध्ये भाग घेतील. ‘इस्रो’ने खास शुक्ला यांच्यासाठी तयार केलेले सात प्रयोग ते करणार आहेत, ज्यामध्ये सूक्ष्म-गुरुत्वाकर्षणाच्या स्थितीत मेथी आणि मुगाला अंकुरित करण्यासारख्या प्रयोगांचा समावेश आहे. याशिवाय ते नासाच्या पाच संयुक्त अभ्यासांमध्येही सहभागी होतील.
'जॉय' सॉफ्ट हंस
‘जॉय’ नावाचा एक छोटासा ‘सॉफ्ट टॉय हंस’ जो या आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहिमेचा एक खास भाग ठरणार आहे. अॅक्सिओम-४ मोहिमेच्या अंतराळयानात, स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून, पृथ्वीच्या कक्षेत पोहोचल्यावर एक अनोखी गोष्ट घडणार आहे. ‘जॉय’ हा सॉफ्ट टॉय हंस अंतराळयानात तरंगू लागेल. तो तिथे कोणत्याही वैज्ञानिक उपकरणासाठी नसेल, पण त्याचे महत्त्व मोठे आहे. या मोहिमेतील प्रमुख, अमेरिकेच्या अनुभवी अंतराळवीर पेगी व्हिटसन, भारतीय वैमानिक गट कॅप्टन शुभांशु शुक्ला, पोलंडचे स्लावोश उझ्नान्स्की-विश्नेव्स्की आणि हंगेरीचे टिबॉर कापू यांनी ‘जॉय’ या हंसाला त्यांच्या मोहिमेचा ‘झीरो ग्रॅव्हिटी इंडिकेटर’ म्हणून निवडले आहे.
‘ह्युमन स्पेस’ची सुरुवात
शुक्ला यांनी म्हटले आहे की, आम्ही आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. ही मोहीम भारताच्या ‘ह्युमन स्पेस प्रोग्राम’ची सुरुवात आहे. त्यामुळे मला वाटते की, सर्व भारतीयांनी या प्रवासात सहभागी व्हायला हवे. तुमची छातीही अभिमानाने भरून आली पाहिजे. तुम्हीही माझ्याइतकाच उत्साह दाखवा. आपण सगळे मिळून भारताच्या या ‘ह्युमन स्पेस जर्नी’ची सुरुवात करुया. ‘जय हिंद, जय भारत’, जवळपास २८ तासांच्या प्रवासानंतर शुक्ला यांचे यान आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात दाखल होईल, असे ‘नासा’ने सांगितले.
खांद्यावर तिरंगा
दरम्यान, शुभांशू शुक्ला यांनी अंतराळातून पृथ्वीवर पहिला संदेश पाठवला आहे. या संदेशात शुक्ला यांनी म्हटले आहे की “नमस्कार, माझ्या प्रिय बांधवांनो, ४१ वर्षांनंतर आपण पुन्हा एकदा अंतराळ प्रवासावर निघालो आहोत. ही राइड भारी आहे. आम्ही सध्या ७.५ किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालत आहोत. माझ्याबरोबर, माझ्या खांद्यावर आपला तिरंगा आहे. हा तिरंगा मला सांगतोय की मी या प्रवासात एकटा नाही.
आईचे डोळे पाणावले
शुक्ला यांचे अंतराळयान अवकाशात झेपावल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या त्यांच्या आई आशा शुक्ला यांचे डोळे पाणावले. त्यांनी मुलाच्या सुखरूप प्रवासासाठी हात जोडले.
‘गगनयान’ला फायदा
‘अक्सिओम मिशन-४ ’वरील शुक्ला यांच्या अनुभवाचा इस्रोच्या ‘गगनयान’ मोहिमेत चांगला उपयोग केला जाईल. इस्रो ‘अक्सिओम-४’ मोहिमेवर ५५० कोटी रुपये खर्च करत आहे.