
नवी दिल्ली : भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन(ISS)मध्ये जाण्यास सज्ज झाले आहेत. लखनऊचे शुभांशू शुक्ला १० जूनला सायंकाळी फ्लोरिडा येथील केनेडीच्या स्पेस सेंटरमधून ‘स्पेसएक्स’च्या ‘फाल्कन-९’ रॉकेटमधून आपला अंतराळातील प्रवास सुरू करतील.
शुभांशू शुक्ला ‘एक्सिओम स्पेस’च्या चौथ्या मानवी अंतराळ यात्रेला जाण्यास तयार आहेत. ते २८ तासांचा प्रवास करून ११ जून रोजी भारतीय वेळेनुसार, रात्री ११ वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहचतील.
शुक्ला या ‘एक्सिओम-४’ मिशनचे वैमानिक आहेत. त्यांच्यासोबत पोलंडचे स्लावोस्ज उजनांस्की-विस्नीवस्की, हंगेरीचे टिबोर कापू आणि अमेरिकेचे अंतराळवीर पॅगी व्हिटसन हे अंतराळात भरारी घेतील.
अंतराळात जाणारे दुसरे भारतीय
शुक्ला हे ४१ वर्षांनंतर अंतराळ प्रवास करणारे दुसरे भारतीय बनतील. यापूर्वी राकेश शर्मा यांनी १९८४ मध्ये रशियाच्या सोयूझ अंतराळ यानातून अंतराळाचा प्रवास केला होता.
मी भाग्यवान
हा एक अद्भुत प्रवास होता; हे असे क्षण आहेत जे तुम्हाला खरोखरच सांगतात की, तुम्ही स्वतःपेक्षा खूप मोठ्या असलेल्या गोष्टीचा भाग बनत आहात. या मोहिमेत मी सहभागी झालो आहे. त्यामुळे मी किती भाग्यवान आहे हे मी फक्त सांगू शकतो, असे शुक्ला यांनी ‘अॅक्सिओम स्पेस’ने जारी केलेल्या एका छोट्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.