लेह : लडाखमधील सियाचीन ग्लेशियरवर झालेल्या हिमस्खलनात भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत. ही जगातील सर्वात उंच युद्धभूमी असून तेथे सैनिकांना उणे ६० अंश थंडी, जोरदार वारे आणि बर्फाच्छादित आव्हानांचा सामना करावा लागतो. मंगळवारी येथे झालेल्या हिमस्खलनात तीन जवानांना वीरमरण आले. लेह आणि उधमपूरची मदत घेत लष्कराच्या बचाव पथकांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले आहे.
हिमस्खलनाची बातमी मिळताच, भारतीय सैन्य आणि हवाई दलाने तातडीने बचावकार्य सुरू केले. विशेष हिमस्खलन बचाव पथके (एआरटी) घटनास्थळी पोहोचली, जी बर्फात गाडलेल्या सैनिकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे पथक लेह आणि उधमपूर येथून समन्वय साधत आहे. जखमींना बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी ‘चित्ता’ आणि ‘एमआय-१७’सारख्या लष्कराच्या हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. सियाचीनमध्ये अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी सैन्य नेहमीच तयार असते, परंतु बर्फ आणि थंडीमुळे बचाव कार्य अत्यंत आव्हानात्मक होते.
१९८४ पासून १ हजारांहून अधिक सैनिक शहीद
हिवाळ्यात सियाचीनमध्ये हिमस्खलन होणे सामान्य आहे. १९८४ मध्ये ‘ऑपरेशन मेघदूत’ सुरू झाल्यापासून खराब हवामानामुळे १,००० हून अधिक सैनिक शहीद झाले आहेत. काराकोरम पर्वतरांगेत २०,००० फूट उंचीवर असलेले सियाचीन ग्लेशियर येथे घडलेली घटना हृदयद्रावक आहे. अशा घटना यापूर्वी सियाचीनमध्ये घडल्या आहेत. पण यावर अद्याप मार्ग निघू शकलेला नाही. हिमस्खलन उत्तरेकडील हिमनदी प्रदेशात झाले, तेथे १८,००० ते २०,००० फूट उंची आहे. या भागात सैनिकांना केवळ शत्रूशीच नाही, तर निसर्गाच्या प्रकोपाशीही लढावे लागते.