प्रज्ज्वल प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यास सिद्धरामय्यांचा नकार

भाजपने यापूर्वी सीबीआयला 'करप्शन ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन' असे संबोधले होते, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.
प्रज्वल रेवण्णा, संग्रहित छायाचित्र
प्रज्वल रेवण्णा, संग्रहित छायाचित्र

बंगळुरू : हसन येथील खासदार प्रज्वल रेवण्णा याच्याविरुद्धच्या लैंगिक छळाच्या आरोपांचा तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्यास रविवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट नकार दिला आणि राज्य पोलिसांच्या एसआयटीवर विश्वास व्यक्त केला.

या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी भाजपने का केली, ते राज्य पोलिसांवर विश्वास का ठेवत नाहीत, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. या प्रकरणाचा तपास एसआयटी योग्य प्रकारे करीत आहे, ते सक्षम आहेत, भाजपने यापूर्वी सीबीआयला 'करप्शन ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन' असे संबोधले होते, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. काँग्रेसने सातत्याने मागणी करूनही भाजप सत्तेत असताना त्यांनी एकही प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द केले नाही, असेही ते म्हणाले.

सीबीआय चौकशीची भाजपची मागणी कायम

कर्नाटकच्या हसन मतदारसंघातील खासदार प्रज्वल रेवण्णा याच्याविरुद्धच्या लैंगिक छळाच्या आरोपांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांनी रविवारीही केली. या प्रकरणाचा योग्य तपास व्हावा यासाठी सीबीआय चौकशीची मागणी करण्यात येत असल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे.

एसआयटी परदेशात जाणार नाही - गृहमंत्री परमेश्वर

लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेला खासदार प्रज्वल रेवण्णा याला मायदेशी आणण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) परदेशात जाणार नाही, त्याच्याबाबतची माहिती इंटरपोल देईल, असे कर्नाटकचे गृहमत्री जी. परमेश्वर यांनी रविवारी येथे सांगितले. सदर प्रकरण संवेदनशील असल्याने त्याबाबत वक्तव्य करताना अथवा कोणतीही माहिती सांगताना राजकीय नेत्यांनी सावधानता बाळगावी, असेही परमेश्वर यांनी म्हटले आहे. प्रज्वल रेवण्णा हा हसन मतदारसंघातील उमेदवार असून तो पहिल्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर २७ एप्रिल रोजी परदेशात गेला. एसआयटी परदेशात जाण्याचा पर्याय नाही, ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली असून इंटरपोल त्याच्याबाबत माहिती देईल, असेही गृहमंत्री म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in