सिलक्यारा बोगदा दुर्घटना : ४१ कामगारांच्या सुटकेला आणखी काही दिवस लागणार ड्रिलिंग मशीन तुटल्याने पुन्हा अडथळा

आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स यांच्या मतानुसार ऑगर ड्रिलिंग यंत्र मोडल्याने मॅन्युअल ड्रिलिंगचा पर्याय विचारात घ्यावा लागत आहे. 
सिलक्यारा बोगदा दुर्घटना : ४१ कामगारांच्या सुटकेला आणखी काही दिवस लागणार ड्रिलिंग मशीन तुटल्याने पुन्हा अडथळा

उत्तरकाशी : भूस्खलनामुळे सिलक्यारा बोगद्यात अडकून पडलेल्या ४१ कामागारांना बाहेर काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रिल यंत्राला शुक्रवारी रात्री पुन्हा अडथळ्याला तोंड द्यावे लागले. त्यामुळे या कामाला पुन्हा मोठा फटका बसला आहे. कामगारांना बाहेर काढण्यासाठी आणखी काही पर्यायांचा विचार केला जात आहे. त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी आणखी दिवस जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स यांच्या मतानुसार ऑगर ड्रिलिंग यंत्र मोडल्याने मॅन्युअल ड्रिलिंगचा पर्याय विचारात घ्यावा लागत आहे. 

बोगद्याच्या आत अडकलेल्या कामगारांसाठी सुटकेचा मार्ग तयार करण्यासाठी ढिगाऱ्यातून ड्रिलिंग करताना ऑगर मशीनला गेल्या काही दिवसांपासून वारंवार अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. या कामाचा गांभीर्याने विचार करताना डिक्स म्हणाले की, आम्ही एका डोंगराशी सामना करीत आहोत. कोणता दरवाजा त्यासाठी उघडू शकेल, ते आम्हाला माहिती नाही. आम्ही त्या स्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत पुढे सरकत आहोत. तसेच घाईघाईने काही करण्यातही अर्थ नाही. अजूनही १०-१२ मीटर अंतर जायचे असून त्यामुळे मॅन्युअली ते काम करण्याचा विचारही केला जात आहे.’’

डिक्स म्हणाले, ‘‘उभ्या ड्रिलिंगचाही विचार केला जात आहे. वरच्या बाजूने ड्रिलिंग करण्यासाठी तेथे जाण्याकरिता बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने रस्ताही तयार केला आहे. त्यामुळे कामगारांना बाहेर काढण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी जाऊ शकतो.’’ एका अधिकाऱ्याने सांगितले की, बोगद्याच्या वर जाण्यासाठी १.५ किमीचा प्रवेश रस्ता आधीच तयार केला गेला आहे. कारण उभ्या ड्रिलिंगचा पर्याय काही काळापासून विचाराधीन आहे. व्हर्टिकल ड्रिलिंग हा अधिक वेळ घेणारा आणि क्लिष्ट पर्याय आहे. बोगद्याच्या छताच्या वरच्या बाजूला कमी जागा असल्याने अत्यंत सावधगिरी बाळगून खुदाई करावी लागणार आहे, असे डिक्सने काही दिवसांपूर्वी सांगितले होते. बचावकार्यात वारंवार अडथळे येत असल्याने, अडकलेल्या कामगारांच्या कुटुंबातील सदस्यांचा संयम हळूहळू सुटत असल्याचे दिसून आले.

नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अॅथॉरिटीचे (एनडीएमए) सदस्य निवृत्त लेफ्ट. जनरल सय्यद अता हसनैन यांनी सांगितले की, ऑगर ड्रिलिंग यंत्रापुढे सतत अडथळे येत असून आता उभ्या मार्गाने ड्रिलिंग करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागू शकेल. यात वेळ जरी गेला तरी अतिशय दक्षतेने हे काम करावे लागले. पुढील २४ ते ३६ तासांत हे व्हर्टिकल ड्रिलिंगचे काम सुरू होऊ शकेल. बोगद्याच्या वरच्या बाजूने मशीन बसवले तरी बोगद्याच्या त्या विशिष्ट ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी ८६ मीटरचे ड्रिलिंग करावे लागेल. त्यानंतर तेथून कामगारांपर्यंत पोहोचता येईल. सध्या दोन पद्धती वापरल्या जात आहेत. ड्रिफ्ट पद्धत देखील लवकरच वापरली जाऊ शकते. सध्या, ४७ मीटर आडवे ड्रिलिंग पूर्ण झाले आहे. ऑगर मशीनचा तुटलेला भाग काढून टाकावा लागेल आणि ड्रिल केलेली रचना स्थिर ठेवावी लागेल.

प्लाझ्मा कटर आणणार

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी पत्रकारांना सांगितले की, हैदराबादहून प्लाझ्मा कटर आणण्यात येत आहे. विमानाने हा कटर येथे आणला जात असून त्यामुळे उर्वरित २५ मीटरचे काम होऊ शकेल, असा विश्वासही धामी यांनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in