६ राज्यांत SIR च्या मुदतीत वाढ; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह पाच राज्ये आणि दिल्ली या केंद्रशासित प्रदेशातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल परीक्षणाचा (एसआयआर) सुधारित कार्यक्रम जाहीर केला.
६ राज्यांत SIR च्या मुदतीत वाढ; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
६ राज्यांत SIR च्या मुदतीत वाढ; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णयसंग्रहित छायाचित्र
Published on: 

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह पाच राज्ये आणि दिल्ली या केंद्रशासित प्रदेशातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल परीक्षणाचा (एसआयआर) सुधारित कार्यक्रम जाहीर केला. संबंधित राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रात १३ नोव्हेंबरपर्यंत हरकती नोंदवता येणार

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, हरयाणा, तेलंगणा आणि नागालँड या पाच राज्यांमधील ‘एसआयआर’चे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. तसेच दिल्लीतील कार्यक्रमालाही मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने संबंधित राज्ये आणि दिल्लीला स्वतंत्र पत्र पाठवले आहे.

महाराष्ट्रात मतदार यादीसंदर्भातील दावे आणि हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत २६ ऑक्टोबरवरून वाढवून १३ नोव्हेंबर करण्यात आली आहे. नोटीस बजावण्याची आणि दावे-हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया आता २५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी ३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

महाराष्ट्रातील प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. यापूर्वी दावे आणि हरकती निकाली काढण्याची अंतिम मुदत १० नोव्हेंबर निश्चित करण्यात आली होती.

दिल्लीत दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत ३० ऑक्टोबरऐवजी आता २५ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. दावे आणि हरकती निकाली काढण्याची मुदत ३० नोव्हेंबरवरून १५ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. दिल्लीची अंतिम मतदार यादी २२ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.

आंध्र प्रदेश आणि हरियाणामध्ये नोटीस बजावण्याची आणि दावे-हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया २० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील. नागालँडमध्ये ही मुदत २५ नोव्हेंबर, तर तेलंगणामध्ये २६ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या चारही राज्यांमधील अंतिम मतदार याद्या ३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)