चेन्नई : सध्या देशातील काही राज्यांत सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणादरम्यान, तमिळनाडूमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘एसआयआर’नंतर तयार करण्यात आलेल्या तमिळनाडूमधील मतदार यादीच्या मसुद्यामधून तब्बल ९७ लाख ३७ हजार ८३२ नावे वगळण्यात आली आहेत, तर नव्या मतदार यादीच्या मसुद्यामध्ये ५ कोटी ४३ लाख, ७६ हजार ७५५ मतदारांचा समावेश आहे.
तमिळनाडूच्या मुख्य निवडणूक अधिकारी अर्चना पटनायक यांनी सांगितले की, मतदार याद्यांच्या पुनरीक्षणानंतर तयार करण्यात आलेल्या राज्यातील मतदार याद्यांच्या मसुदा यादीमध्ये ५ कोटी ४३ लाख, ७६ हजार ७५५ मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये २ कोटी ६६ हजार महिला आणि २ कोटी ७७ लाख पुरुषांचा समावेश आहे. ‘एसआयआर’पूर्वी तामिळनाडूमध्ये सुमारे ६ कोटी ४१ लाख नोंदणीकृत मतदार होते. तसेच या प्रक्रियेनंतर त्यापैकी तब्बल ९७ लाख ३७ हजार ८३२ मतदारांची नावे हटवण्यात आली आहेत.
हटवण्यात आलेल्या मतदारांमध्ये तब्बल २६ लाख ९४ हजार मृत मतदारांचा समावेश आहे. तर ६६ लाख ४४ हजार मतदार असे आहेत जे कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले आहेत. त्याशिवाय ३ लाख ३९ हजार २७८ दुबार मतदारांची नावेही यादीतून हटवण्यात आली आहेत. या मतदारांची नावे एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंवललेली दिसून आली, अशी माहिती अर्चना पटनायक यांनी दिली.
दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी केलेल्या तीव्र विरोधानंतरही तामिळनाडूमध्ये ‘एसआयआर’ची प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाने ‘एसआयआर’विरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिकाही दाखल केली होती. आता ‘एसआयआर’वर टीका करताना स्टॅलिन यांनी त्याचा लोकशाहीविरोधी पाऊल असा उल्लेख केला आहे. तसेच निवडणुकीच्या काही महिने आधी मतदार याद्यांचे पुनरीक्षण करण्याचा निर्णय हा मतदारांना हटवण्याचा जाणीवपूर्वक केलेला कट आहे, असा आरोपही स्टॅलिन यांनी केला.