SIR विरोधात देशव्यापी आंदोलन; २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार दुसरी फेरी

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेला विरोध करण्यासाठी देशव्यापी आंदोलनाची दुसरी फेरी २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. संविधान दिनाचे औचित्य साधून सुरू होणाऱ्या या मोहिमेत महाराष्ट्रासह ज्या राज्यांमध्ये ‘एसआयआर’ प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, त्या राज्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याची घोषणा आंदोलकांनी मंगळवारी मुंबईत केली.
SIR विरोधात देशव्यापी आंदोलन; २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार दुसरी फेरी
SIR विरोधात देशव्यापी आंदोलन; २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार दुसरी फेरीसंग्रहित छायाचित्र
Published on: 

मुंबई : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेला विरोध करण्यासाठी देशव्यापी आंदोलनाची दुसरी फेरी २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. संविधान दिनाचे औचित्य साधून सुरू होणाऱ्या या मोहिमेत महाराष्ट्रासह ज्या राज्यांमध्ये ‘एसआयआर’ प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, त्या राज्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याची घोषणा आंदोलकांनी मंगळवारी मुंबईत केली.

पत्रकार परिषदेत आंदोलकांनी ‘एसआयआर’ प्रक्रिया असंवैधानिक असल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगाने (ईसीआय) ही प्रक्रिया राबविण्याचा औपचारिक निर्णय घेतलेला नसल्याचा दावा करत ‘एसआयआर’ रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. पश्चिम बंगालमध्ये राबविण्यात आलेली प्रक्रिया आणि महाराष्ट्रातील प्रक्रिया यामध्ये मोठी तफावत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

‘एसआयआर’ विरोधातील ही मोहीम कमी झालेली नसून ती अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स (एपीसीआर), पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज (पीयूसीएल), महाराष्ट्र एसआयआर जनजागृती अभियान आणि कॉकरोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींनी यावेळी स्पष्ट केले. ‘एसआयआर’ घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्याचे दर्शविणारी कागदपत्रे आयोगाकडे नसल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, बिहारमधील ‘एसआयआर’ संदर्भात २७ मे २०२६ रोजीच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला ही प्रक्रिया राबविण्याचा अधिकार असल्याचे मान्य केले होते.

नॅशनल कॅम्पेन फॉर पीपल्स राइट टू इन्फॉर्मेशनच्या (एनसीपीआरआय) सहसंयोजक अंजली भारद्वाज यांनी जवळपास १०० कोटी मतदारांना नागरिकत्व सिद्ध करण्यास सांगितले जात असून, अन्यथा मतदानाचा अधिकार गमावण्याचा धोका असल्याचा दावा केला. जून २०२५ मध्ये कोणतीही चर्चा न करता निवडणूक आयोगाने बिहारपासून देशभर ‘एसआयआर’ राबविण्याचा आदेश दिला, असे त्यांनी म्हटले. ही प्रक्रिया का राबविण्यात येत आहे, याचे स्पष्टीकरण दिले गेले नाही. सार्वजनिक निधी खर्च होत असताना नागरिकांच्या मतदानाच्या अधिकारावर परिणाम होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘एसआयआर’ प्रक्रियेच्या निर्णयासंदर्भातील कागदपत्रांची माहिती मागितली असता, निवडणूक आयोगाने अशी कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे सांगितल्याचा दावा भारद्वाज यांनी केला. हा निर्णय आयोगाने घेतला नसेल तर तो पंतप्रधान कार्यालयात किंवा भाजप कार्यालयात घेतलाय का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘एसआयआर’ निर्णयाची माहिती उपलब्ध नाही : भूषण

सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत केलेल्या अर्जातून ‘एसआयआर’चा निर्णय कसा घेण्यात आला, याबाबत माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आल्याचा दावा केला. मतदारांची नावे समाविष्ट करण्याचा अधिकार स्थानिक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना (ईआरओ) असतानाही अनेक ठिकाणी मनमानी पद्धतीने नावे समाविष्ट करण्यात आली किंवा वगळण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला.

भाजपला फटका बसल्यावर ‘एसआयआर’ : यादव

‘भारत जोडो’ अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांनी भारताच्या निवडणूक प्रक्रियेबद्दल पूर्वी अभिमान वाटत असल्याचे सांगितले. २००१ मध्ये अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना निवडणूक आयोगाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात आपण आयोगाचे राजदूत होतो, असेही त्यांनी सांगितले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला जागांचा फटका बसल्यानंतर ‘एसआयआर’ प्रक्रिया सुरू करण्यात आली, असा आरोप यादव यांनी केला. निवडणूक व्यवस्थेत बदल करण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचना आणि ‘एक देश, एक निवडणूक’ यांसारख्या प्रस्तावांचा वापर केला जात असल्याचे त्यांनी म्हटले.

भाजपच्या फायद्यासाठी मतदारसंघांच्या सीमा बदलल्या

निवडणूक प्रक्रियेत मूलभूत बदल करून भाजपला फायदा होईल, अशा पद्धतीने मतदारसंघांच्या सीमा बदलल्या जात असल्याचा आरोप यादव यांनी केला. आसाममधील मतदारसंघ पुनर्रचना हे त्याचे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. महिला आणि अल्पसंख्याक समुदायांनाही मतदार यादीतून वगळण्याचा धोका असल्याचा आरोप त्यांनी केला.

न्यायालयाकडून आशा : मिहिर देसाई

‘एसआयआर’विषयी न्यायालयीन प्रक्रियेवर बोलताना पीयूसीएलचे वकील मिहिर देसाई यांनी न्यायालयाकडून काही आशा वाटत असल्याचे सांगितले. मात्र, न्यायालयीन लढाईबरोबरच रस्त्यावर उतरूनही संघर्ष केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)