
पाटणा : बिहारच्या मतदार यादीचे ‘शुद्धीकरण’ पूर्ण झाल्यानंतर आता देशभरातील सर्व मतदार याद्यांचे सखोल पुनर्विलोकन (एसआयआर) केले जाणार आहे, अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी रविवारी केली.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकांसाठी अनेक नवे उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमांची अंमलबजावणी पुढील काळात देशभर केली जाणार आहे. बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबरला संपणार आहे. तत्पूर्वी ही निवडणूक घेतली जाईल.
पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी ते म्हणाले की, बिहारमध्ये यशस्वीपणे ‘विशेष सखोल’ पुनर्विलोकन झाले. यामुळे मतदार यादी शुद्ध झाली.
राज्यातील दौरा पूर्ण करण्यापूर्वी पाटण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना कुमार म्हणाले की, या नव्या उपक्रमांमध्ये नोंदणी झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत मतदारांना त्यांचे ‘ईपीआयसी’ ओळखपत्र पोहोचावे यासाठी नवीन ‘एसओपी’ (मानक कार्यपद्धती) तयार करण्यात आली आहे, तसेच मतदान केंद्रांवर ‘मोबाईल डिपॉझिट’ सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ते म्हणाले, “बिहारमध्ये २४३ सदस्यांसाठी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया २२ नोव्हेंबरपूर्वी पूर्ण केली जाईल. सर्व २४३ मतदारसंघात एक निवडणूक नोंदणी अधिकारी (ईआरओ) आहे. त्यांना ९०,२०७ ‘बीएलओं’नी मतदार यादीत सखोल पुनर्विलोकन मोहीम पूर्ण करण्यात सहाय्य केले. ज्यामुळे २२ वर्षांनंतर मतदार यादीचे शुद्धीकरण झाले आहे,” असे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासोबत निवडणूक आयुक्त सुबीरसिंह सिंधू आणि विवेक जोशी उपस्थित होते. त्यांनी दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आणि अधिकाऱ्यांसोबत निवडणूक तयारीचा आढावा घेतला.
एका मतदान केंद्रावर १,२०० मतदार
बीएलओ जेव्हा मतदारांकडे जातात, तेव्हा मतदाराने त्यांना चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी त्यांच्यासाठीही ओळखपत्र सुरू केले. तसेच मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्याची सुविधा केली. बिहार सोडून कोणत्या मतदान केंद्रावर १,२०० हून अधिक मतदार नसतील, असे ज्ञानेश कुमार यांनी सांगितले.
मतदान केंद्रावर १०० टक्के वेबकास्टिंग
बिहारमध्ये ‘वन स्टॉप डिजिटल’ व्यासपीठ सुरू केले जाईल. बूथपासून १०० मीटरवर प्रत्येक उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांना बसवू शकतो. मतदान केंद्रावर १०० टक्के वेबकास्टिंग केले जाईल. पूर्वी कमीत कमी ५० टक्के मतदान केंद्रांची वेबकास्टिंग होत होती. तसेच ‘ईव्हीएम’वरील मतपत्रिका ही कृष्णधवल वर्णाची होती. आता ‘ईव्हीएम’वर रंगीत मतपत्रिका असेल. तसेच पोस्टातून आलेल्या मतपत्रिकांची गणना ईव्हीएमच्या शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये केली जाईल. निवडणूक संपल्यावर किती लोकांनी मतदान केले, महिलांनी किती मतदान केले आदींची माहिती दिली जाईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले.