काँग्रेसचे सहा बंडखोर अपात्र; हिमाचलच्या राजकीय नाट्यावर पडदा; सुक्खू हेच मुख्यमंत्रीपदी कायम

हिमाचल प्रदेशातील राजकीय अस्थिरता दूर करण्यात सत्तारूढ काँग्रेस पक्षाला यश आले असून सुखविंदरसिंह सुक्खू हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, असा निर्वाळा गुरुवारी काँग्रेसच्या नेत्यांनी दिला.
काँग्रेसचे सहा बंडखोर अपात्र; हिमाचलच्या राजकीय नाट्यावर पडदा; सुक्खू हेच मुख्यमंत्रीपदी कायम

सिमला : हिमाचल प्रदेशातील राजकीय अस्थिरता दूर करण्यात सत्तारूढ काँग्रेस पक्षाला यश आले असून सुखविंदरसिंह सुक्खू हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, असा निर्वाळा गुरुवारी काँग्रेसच्या नेत्यांनी दिला. राज्यसभेच्या निवडणुकीत बंडखोरी झाल्यानंतर काँग्रेसने तातडीने राज्यात तीन निरीक्षक धाडले होते. त्यांनी आमदारांशी स्वतंत्रपणे चर्चा केली आणि सर्व मतभेद दूर झाल्याचे स्पष्ट केले. यानंतर पक्ष आणि सरकार वाचविण्यासाठी सहा सदस्यांची एक समिती नियुक्त करण्याचाही निर्णय घेण्यात आला आणि राज्यातील राजकीय नाट्यावर पडदा पडला. आता लोकसभेच्या आगामी निवडणुकीला आमचे प्राधान्य असेल, असे काँग्रेसने स्पष्ट केले.

दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी अलीकडेच झालेल्या निवडणुकीत बंडखोरी करून भाजपच्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या सहा आमदारांना विधानसभेचे अध्यक्ष कुलदीपसिंह पठाणिया यांनी गुरुवारी अपात्र ठरविले. राज्यातील राजकीय स्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून निवडून आलेले सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न म्हणजेच ऑपरेशन लोटस पूर्णपणे फसले आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

विधानसभेत अर्थसंकल्पावरील मतदानाच्या वेळीही हे सहा आमदार गैरहजर राहिले आणि वित्त विधेयकावर मतदान करण्याचा पक्षादेशही या सहा आमदारांनी धुडकावला. त्यांना अपात्र ठरविताना ही कारणे नमूद करण्यात आली आहेत. या सहा बंडखोर आमदारांनी निर्णयाला न्यायालयात आ‌व्हान दिल्याचेही वृत्त आहे.

अपात्र ठरविण्यात आलेल्या आमदारांची नावे राजिंदर राणा, सुधीर शर्मा, इंदरदत्त लखनपाल, देविंदरकुमार भुतू, रवी ठाकूर आणि चैतन्य शर्मा अशी आहेत.

राज्यातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर पक्षात ऐक्य असल्याचे दर्शवून देण्यासाठी मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुक्खू यांनी गुरुवारी सकाळी पक्षाच्या आमदारांसाठी चहापान आयोजित केले होते. या चहापानाला किती आमदार हजर होते आणि त्यावेळी काय ठरविण्यात आले ते त्वरित कळू शकले नाही, मात्र सरकार आपला कार्यकाळ निश्चितच पूर्ण करील, असे मत यावेळी हजर असलेल्या बहुसंख्य आमदारांनी व्यक्त केले.

चहापान बैठक सुरू असतानाच अध्यक्ष पठाणिया यांनी सहा बंडखोर आमदारांच्या अपात्रतेची घोषणा केली. हे आमदार पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांनी पक्षादेश धुडकावला. त्यामुळे पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, असे पठाणिया म्हणाले. त्यांच्यावरील कारवाईची अंमलबाजवणी त्वरित केली जाणार आहे.

पठाणिया यांनी भाजपच्या १५ आमदारांना निलंबित केल्यानंतर सभागृहात वित्त विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. त्यानंतर अध्यक्षांनी अधिवेशन संस्थगित केले.

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रसेने धाडलेल्या निरीक्षकांनी पक्षाच्या आमदारांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. बंडखोर सहा आमदार त्यावेळी शहरातही हजर नव्हते.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी बुधवारी आपण मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. पक्षात अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा त्यांचा आक्षेप होता. मात्र अवघ्या काही तासांतच त्यांनी घूमजाव करीत आपण राजीनामा मंजूर करण्याचा आग्रह धरणार नाही, असे स्पष्ट केले.

प्रियंकांची महत्त्वाची भूमिका

राज्यातील जनाधार अबाधित ठेवण्यात, त्याचप्रमाणे भाजपचे ऑपरेशन लोटस उधळून लावण्यात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वड्रा यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रियंका सातत्याने पक्षाध्यक्ष खर्गे, मुख्यमंत्री सुक्खू आणि पक्षाच्या अन्य नेत्यांच्या सातत्याने संपर्कात होत्या, असेही सूत्रांनी सांगितले. राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारली असल्याचे काँग्रेसचे निरीक्षक डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in