श्रीनगर : झेलम नदीत मंगळवारी एक बोट उलटून त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या बोटीत बहुसंख्य शालेय विद्यार्थी होते.
गंडबल नौगाव परिसराजवळ सकाळी ८ वाजता ही दुर्घटना घडली. काश्मीर खोऱ्यात दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने नदीच्या पातळीत वाढ झाली होती. बोट बुडाल्यानंतर नदीतून सहा जणांना बाहेर काढण्यात आले. बोटीत नक्की किती जण होते त्याची माहिती मिळू शकलेली नाही.
या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या बोटीत जवळपास १५ जण होते, अशी प्राथमिक माहिती आहे. त्यामध्ये सात अल्पवयीन मुले होती. नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानंतर आम्ही सावधानतेचा इशारा दिला होता, असे श्रीनगरचे उपायुक्त बिलाल मोही-उद-दीन भट यांनी सांगितले. बोटीत क्षमतेहून अधिक प्रवासी होते का, याची माहिती घेण्यात येत आहे, असे ते म्हणाले.