कौशल्य असलेल्या लोकांना भारतात दूर सारले जाते -राहुल

भारतामध्ये कौशल्याचा अभाव नाही, मात्र कौशल्य असलेल्या लाखो लोकांना भारतात दूर सारण्यात आले आहे, अशी खंत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी येथे व्यक्त करताना महाभारतातील एकलव्याचचे उदाहरण दिले.
कौशल्य असलेल्या लोकांना भारतात दूर सारले जाते -राहुल
Published on

वॉशिंग्टन : भारतामध्ये कौशल्याचा अभाव नाही, मात्र कौशल्य असलेल्या लाखो लोकांना भारतात दूर सारण्यात आले आहे, अशी खंत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी येथे व्यक्त करताना महाभारतातील एकलव्याचचे उदाहरण दिले.

भारतामध्ये कौशल्याचा अभाव नाही, तर कौशल्याचा आदर करण्याचा अभाव आहे. तुम्हाला एकलव्याची कथा माहिती आहे का, तुम्हाला भारतामध्ये काय चालले आहे ते समजून घ्यावयाचे असेल तर दर दिवशी तुम्हाला लाखो एकलव्याच्या कथा दिसतील. कौशल्य असलेल्या लोकांना दूर सारण्यात आले आहे, त्यांची भरभराट होऊ दिली जात नाही आणि असे प्रकार सगळीकडेच आहेत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

भारतामध्ये कौशल्याचा अभाव आहे असे अनेक जण म्हणतात, मात्र भारतात कौशल्याचा अभाव आहे असे आपले मत नाही. ज्यांच्याकडे कौशल्य आहे त्यांचा आदर करण्याच्या बाबतीत भारतात अभाव आहे, ज्यांच्याकडे कौशल्य आहे त्याला आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या सहकार्य करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

विरोधी पक्ष हा जनतेचा आवाज आहे, जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबतचा त्यांचा दृष्टिकोन काळजीपूर्वक आणि संवेदन क्षमतेने जाणून घेतल्यानंतर त्याबाबत आवाज उठविणे हे विरोधी पक्षांचे काम आहे, असे प्रतिपादन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी डल्लास येथे केले.

राहुल गांधी चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आले असून रविवारी त्यांनी डल्लासमधील टेक्सास विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विरोधी पक्ष हा जनतेचा आवाज आहे, तुम्ही त्याकडे व्यक्तिगत, औद्योगिक, शेतकरी यांच्या दृष्टिकोनातून पाहता, मात्र जनतेला भेडसावणारे प्रश्न प्रथम काळजीपूर्वक ऐकले पाहिजेत आणि ते समजून घेतले पाहिजेत. त्यानंतर तुम्ही ते मांडू शकता, असे गांधी म्हणाले.

भारतीय राजकारणात प्रेम, आदर, नम्रतेचा अभाव - राहुल गांधी

भारतीय राजकारणात प्रेम, आदर आणि नम्रता यांचा अभाव असल्याची खंत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी येथे व्यक्त केली. टेक्सासमधील भारतीय अमेरिकी लोकांना संबोधित करताना गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. भारत ही केवळ एक कल्पना आहे यावर त्यांचा विश्वास असल्याचा टोलाही त्यांनी हाणला.

चीनमध्ये बेरोजगारीची समस्या नाही - राहुल

भारत, अमेरिका आणि अन्य पाश्चिमात्य देशांमध्य बेरोजगारीची समस्या आहे, मात्र जागतिक उत्पादनामध्ये चीनचे वर्चस्व असल्याने त्या देशाला बेरोजगारीची समस्या भेडसावत नाही, असे मत लोकसभेतील विरोध पक्षनेते राहुल गांधी यांनी येथे व्यक्त केले आणि भारतातील उत्पादनावर अधिक प्रकाशझोत टाकण्याची गरज अधोरेखित केली.

राहुल भारतीय लोकशाहीवरील 'काळा डाग' - भाजपची टीका

नवी दिल्ली : अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तेथे केलेल्या वक्तव्यांवर भाजपने जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी हे भारतीय लोकशाहीवरील काळा डाग असल्याचे भाजपने म्हटले आहे. परदेशात जाऊन वक्तव्य करून राहुल गांधी भारतीय लोकशाही तकलादू करीत आहेत, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी म्हटले आहे. राहुल गांधी हे परिपक्व नेते नाहीत याची प्रत्येकाला जाणीव आहे, ते अर्धवेळ नेते आहेत, तरीही जनतेने त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. परदेशात गेल्यावर कसे वक्तव्य करावे याचीही त्यांना जाणीव नाही, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in